Hashtagintro

Mohan Agashe : त्यांना खूप उलट्या झाल्या अन्…नाटकाच्या प्रयोगादरम्यान मोहन आगाशेंची बिघडलेली तब्येत, अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग

Mohan Agashe : त्यांना खूप उलट्या झाल्या अन्…नाटकाच्या प्रयोगादरम्यान मोहन आगाशेंची बिघडलेली तब्येत, अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी थत्तेनं ‘काटकोन त्रिकोण‘ या नाटकात काम केलं आहे. या नाटकामध्ये डॉ. मोहन आगाशे यांनीही भूमिका साकारली. या नाटकाचे अनेक प्रयोग झाले. एका प्रयोगादरम्यान मोहन आगाशेंची तब्यत खूप बिघडलेली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. याबद्दल अभिनेत्रीनं एका मुलाखतीत सांगितलं आहे.

केतकी थत्तेनं सांगितला प्रसंग

केतकी थत्ते म्हणाली की, ‘खरंतर असा प्रसंग वैऱ्यावरही येऊ नये. आपण नाटक ही जिवंत कला म्हणतो, त्याचं हे उदाहरण आहे. आमचा बोरिवलीला प्रयोग होता. तेव्हा आबांना (मोहन आगाशे) बरं नव्हतं. त्यांना खूप ताप येत होता, ते गोळ्या घेत होता. मी त्यांना प्रयोगाला जातानाही म्हटलेलं, मी गाडी चालवते, पण ते ऐकले नाहीत. प्रयोगाच्या आधीही आमचं बोलणं झालं. तुम्हाला बरं नसेल तर, आपण प्रयोग नको करूया का? असं त्यांना विचारलेलं. पण, आबांनी नकार दिला आणि ते रंगमंचावर उभे राहिले.’

‘पहिला अंक सुरू झाला, मध्यावरून शेवटाकडे जायला लागलो, तसतशी त्यांची तब्येत बिघडायला लागली. त्यांना अचानक उलटी सारखं व्हायला लागलं. सीन संपल्यानंतर ते आतमध्ये जाऊन उलटी करून आले. त्यांनी बालदी आणायला सांगितली. पण, त्यांना सारखी उलटी व्हायला लागली. त्यामुळे, मध्यांतरामध्ये आम्ही म्हटलं, आता तुम्ही प्रयोग नाही करायचा. लगेच आम्ही आबांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. ते तेव्हाही ऐकत नव्हते.’

‘पण, मध्यांतर झालेला आणि अर्ध नाटक बाकी होतं. दोन पर्याय होते, प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत द्यायचे, किंवा आम्ही नाटक वाचून पूर्ण करायचं. त्या नाटकात माझ्या नवऱ्याचं काम संदेश कुलकर्णी करत होता. आम्ही प्रेक्षकांशी बोलून त्यांना दोन्ही पर्याय सांगितले. प्रेक्षक स्वतःहून आम्हाला म्हणाले, आमचा आताचा अनुभव अर्धवट राहील ना, तुम्ही मग अर्धा अंक वाचून आमच्यासमोर सादर करा. पण, आम्हाला ऐकायचंय. तेव्हा मी आणि संदेशनं चर्चा केली. आम्ही स्क्रिप्ट घेतल्या आणि ते नाटक दोघांनी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. एकही व्यक्ती उठून गेली नाही आणि आम्ही संपूर्ण प्रयोग तसाच सादर केला. प्रेक्षकांचं नाटकावरचं प्रेम मला त्यादिवशी जाणवलं.’ असं केतकी शेवटी म्हणाली. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन‘ला दिलेल्या मुलाखतीत केतकी थत्ते बोलत होती.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language