Hashtagintro

गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या बोगदा खणन कामाला गती! ‘तुळशी’द्वारे १८३ मीटर खोदकाम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्पाच्या टप्पा ३ (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बांधण्यात येणाऱ्या दुहेरी बोगद्याच्या कामाला गती मिळत आहे. या प्रकल्पातील ‘तुळशी’ या पहिल्या बोगदा खनन संयंत्राद्वारे (टीबीएम) आतापर्यंत १८३ मीटर लांबीचे खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच, ‘विहार’ या दुसऱ्या बोगदा खनन संयंत्राची स्थळ स्वीकृत चाचणी पूर्ण झाली असून, दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामाचा मार्गही मोकळा झाला आहे.
https://www.prahaar.in/2026/10/20/re-implementation-of-the-e-office-system-in-the-brihanmumbai-municipal-corporation-bmc-a-total-of-14000-users-will-be-brought-on-board-in-a-phased-manner/
महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सोमवारी १९ ऑक्‍टोबर २०२६ रोजी प्रकल्पस्थळाला भेट देऊन सुरू असलेल्या बोगदा खनन कामाची प्रत्‍यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बोगदा खननाची कार्यपद्धती, कामाची सद्यस्थिती, प्रकल्पाची प्रगती, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता, बांधकामाचा दर्जा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. निर्धारित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (पायाभूत प्रकल्प) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) नरेश मेघराजानी यांच्यासह संबंधित अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

‘तुळशी’द्वारे १८३ मीटर खोदकाम पूर्ण
गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर या दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी तीन मार्गिकांचे, सुमारे ५.३० किलोमीटर लांबीचे दोन समांतर बोगदे बांधण्यात येत आहेत. या महत्त्वपूर्ण कामासाठी अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रांचा वापर करण्यात येत आहे. या कामातील ‘तुळशी’ हे पहिले बोगदा खनन संयंत्र १७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत १८३ मीटर खोदकाम पूर्ण झाले असून, प्रतिदिन सरासरी ५.५ मीटर खोदकाम केले जात आहे. बोगद्याच्या संरचनेचा महत्त्वाचा भाग असलेल्या ८७ कंकणाकृती कडांची उभारणीही पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय, तात्पुरत्या स्वरूपातील सहा कंकणाकृती कडांची उभारणी करण्यात आली आहे. आयुक्त आश्विनी भिडे यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीची माहिती घेतली.

‘विहार’ संयंत्राच्या चाचण्या पूर्ण
दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘विहार’ या बोगदा खनन संयंत्राची स्थळ स्वीकृत चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे. निर्धारित निकषांनुसार तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यामुळे दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्णत्वाच्या टप्प्यावर आली आहे.

कामाचा वेग, सुरक्षितता आणि गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य
महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सांगितले की, गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत बोगदा खननाच्या कामाला सुरुवात झाली असून, एका बोगद्याचे १८३ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. सध्या प्रतिदिन सरासरी ५.५ मीटर खोदकाम होत असून, त्यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग सातत्याने कायम राखणे आवश्यक आहे. कामाच्या प्रगतीचा, उपलब्ध यंत्रसामग्रीचा, तांत्रिक बाबींचा आणि मनुष्यबळाच्या आवश्यकतेचा नियमित आढावा घेऊन गरजेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ व तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही देण्‍यात आले आहेत.
बोगदा खननाचे काम तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक असल्याने कामाचा वेग राखतानाच कामगार आणि अभियंत्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. बोगदा खननाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करावे, आवश्यक सुरक्षा साधने व उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करावी आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात,अशा सूचना महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केल्या.

गोरेगाव उड्डाणपुलाचे काम पूर्ण, प्रतीक्षा लोकार्पणाची
गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या टप्पा ३ अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीपर्यंत जाणाऱ्या १.२६ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सोमवारी सकाळी या उड्डाणपुलाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. तसेच, प्रकल्पाशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेत आवश्यक निर्देश दिले आहेत. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे आता प्रतीक्षा लोकार्पणाची आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language