जपानमधील ऐची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ (Asian Para Games 2026) मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली दमदार कामगिरी कायम राखली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या पाचवर पोहोचली असून, यात पॅरा-अथलीट दीप्ती जीवनजी हिने चमकदार कामगिरी करत नवा इतिहास रचला आहे.
https://www.prahaar.in/2026/10/20/buy-gold-and-live-a-life-as-precious-as-gold-send-these-special-wishes-to-your-loved-ones-for-dussehra/
महिलांच्या ४०० मीटर टी-२० प्रकारात भारताच्या दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकास गवसणी घातली. तिने ५६.३६ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत नवीन ‘गेम्स रेकॉर्ड’ आपल्या नावावर केला. पेरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या दीप्तीने या शर्यतीत सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तब्बल दोन सेकंदांहून अधिक मागे टाकले. या शर्यतीत जपानच्या निना कानोने (५८.९२ सेकंद) रौप्य आणि अकाने काटोने (१:००.२६ मिनिटे) कांस्यपदक पटकावले.
दीप्तीच्या या सुवर्ण यशाव्यतिरिक्त इतर खेळांमध्येही भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे:
पॅरा टेबल टेनिस : अनुभवी खेळाडू भाविना पटेल हिने महिलांच्या एकेरीच्या (क्लास ४-५) उपांत्य फेरीत धडक मारत भारतासाठी कांस्यपदक निश्चित केले. उपांत्य सामन्यात तिला चीनच्या झांग बियानकडून ७-११, ५-११, ७-११ असा पराभव पत्करावा लागला, तरी तिचे पदक पक्के झाले आहे.
पॅरा बॅडमिंटन : मिक्स्ड SL3-SU5 प्रकारात प्रमोद भगत आणि मनीषा रामदास या भारतीय जोडीने थायलंडच्या जोडीचा अवघ्या २५ मिनिटांत २१-१५, २१-१४ असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि आपले पदक सुरक्षित केले.
तिरंदाजी (आर्चरी) : वैयक्तिक प्रकारात भारताच्या हरविंदर सिंग, भावना, शीतल देवी, पायल नाग, तोमन कुमार आणि श्याम सुंदर स्वामी या सर्व तिरंदाजांनी उत्कृष्ट खेळ करत आघाड्यांवर विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत (क्वाटर फायनल) प्रवेश केला आहे.
भारतीय खेळाडूंच्या या अष्टपैलू आणि धडाकेबाज कामगिरीमुळे संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली असून, आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.
Source: Prahaar News
