
Madhuri Pawar: ‘अप्सरा आली’ या रिअॅलिटी शोमधून विजेतेपद पटकावणारी आणि आपल्या अभिनय, नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री माधुरी पवार हिने काही दिवसांपूर्वी मोठा खुलासा केला होता. गेल्या काही वर्षांपासून आपल्याला ऑनलाइन पद्धतीने त्रास दिला जात असल्याचा दावा तिने व्हिडीओ पोस्ट करत केला होता. या त्रासामुळे मानसिक तणावासोबतच सुरक्षेचीही चिंता वाटत असल्याचं तिने म्हटलं होतं. यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. माझ्या घरात एकही पैसा घाणेरड्या गोष्टीत आलेला नाही, असं तिने छातीठोकपणे सांगितलं आहे.
माधुरी म्हणाली, “जेव्हा मला कळतं की आज माझं विकिपीडिया पेज नाही, जेव्हा मला कळतं की माझा नंबर हॅक केला गेला, बाहेर लोकांचा दृष्टीकोन बदलतोय, लोकांना असं वाटतं की हिला काम नाही म्हणून ही अशी करतेय का, पब्लिसिटी स्टंटसाठी असं करतेय का.. हे सर्व पाहून मला खूप वाईट वाटतं. मला काही अशी प्रसिद्धी मिळाली नाही की 30 सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि रातोरात माधुरी पवार हे नाव वर आलं. गेली पंधरा वर्षे मी माझ्या कलेला प्रामाणिकपणे दिली आहेत. मला रागही येतो. पण कलाकाराला नटराजाने एक खूप मोठी बाजू दिली आहे, ते म्हणजे संयम. जिथे उग्र व्हायचं असेल, तिथे मी शांत बसणार नाही. पण इतर ठिकाणी मला तेवढाच संयम ठेवावा लागतो.”
माधुरी पवारचा व्हिडीओ-
View this post on Instagram
“माझ्या कुटुंबात मी मोठी मुलगी आहे. आईवडील आणि एक बहीण आहे. छोट्या भावाचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं. जेव्हा तुमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते, तेव्हा असं काही घडलं की खूप वाईट वाटतं. लोक असं का करत असतील, असा प्रश्न पडतो. मी कधीच दुसऱ्याच्या ताटातलं काही ओढलं नाही. पण एवढी संकटं आली तरी मी तुटणारी नाहीये. नाहीतर या इंडस्ट्रीतून मी कधीच गायब झाले असते. मी छातीठोकपणे सांगते की मी माझ्या कलेशी खूप प्रामाणिक आहे. माझ्या घरात आजपर्यंत एक रुपयाही कुठल्याही घाणेरड्या गोष्टीचा आलेला नाही, कुणालाही फसवून आलेला नाही, कामात आळसपणा करून पैसे घेतले, असंही कधी केलं नाही. याचा सगळ्यात जास्त अभिमान माझ्या आईवडील आणि बहिणीला आहे,” अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
माधुरी पवारच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अत्यंत आक्षेपार्ह कमेंट्स केल्या जात होत्या. इतकंच नव्हे तर तिचं विकिपिडिया पेजही काढून टाकण्यात आलं होतं. याप्रकरणी तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तक्रार केली होती.
Source: TV9 Marathi Entertainment
