Hashtagintro

Laxmikant Berde : तिच्या अंगावरील एकही दागिना…पहिल्या पत्नीच्या निधनानं खचलेले लक्ष्मीकांत बेर्डे, अंत्यसंस्कारावेळी घेतलेला मोठा निर्णय

Laxmikant Berde : तिच्या अंगावरील एकही दागिना…पहिल्या पत्नीच्या निधनानं खचलेले लक्ष्मीकांत बेर्डे, अंत्यसंस्कारावेळी घेतलेला मोठा निर्णय

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या सहजसुंदर अभिनयानं आणि अचूक विनोदी टायमिंगनं अनेक चित्रपट गाजले. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक दुःखद प्रसंग आले. त्यापैकी सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांच्या पहिल्या पत्नी अभिनेत्री रुही बेर्डे यांचं अकाली निधन. रुही यांच्या निधनानंतर लक्ष्मीकांत बेर्डे पूर्णपणे खचून गेले होते. रुही यांच्या अंत्यसंस्कारावेळी लक्ष्मीकांत यांनी घेतलेला एक निर्णय आजही अनेकांच्या मनाला चटका लावतो.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि रुही बेर्डे यांची ओळख ‘वेडी माणसं’ या नाटकाच्या निमित्तानं झाली. एकत्र काम करताना दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. अखेर १९८५ मध्ये दोघांनी लग्न केलं. रुही बेर्डे या स्वतः एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. ‘आ गले लग जा’, ‘आराम हराम है’, ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘दोस्त असावा तर असा’, ‘दुनिया करी सलाम’, ‘जावई विकत घेणे आहे’ आणि ‘मामला पोरींचा’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.

विशेष म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात रुही यांचं नाव आधीच प्रसिद्ध होतं. मात्र, लग्नानंतर त्यांनी आपल्या संसाराची जबाबदारी स्वीकारली आणि लक्ष्मीकांत यांच्या कारकिर्दीला पाठिंबा दिला.

पतीच्या यशासाठी रुही यांनी घेतला होता मोठा निर्णय

लक्ष्मीकांत बेर्डे यांची कारकीर्द बहरत असताना रुही यांनी घराकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मीकांत यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ते सुरुवातीच्या काळात फारसे प्रसिद्ध नसतानाही पत्रकार रुही यांची मुलाखत घेण्यासाठी येत असत. त्यावेळी रुही त्यांना आपल्यासोबत लक्ष्मीकांत यांचीही मुलाखत घेण्यास सांगत असत. कारण भविष्यात ते मोठे सुपरस्टार होतील, असा त्यांना विश्वास होता.

ब्रेन हॅमरेजमुळे रुही यांचं अकाली निधन

सर्व काही सुरळीत सुरू असताना रुही बेर्डे यांचं ब्रेन हॅमरेज झालं. ५ एप्रिल १९९८ रोजी त्यांचं निधन झालं. या घटनेनं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. रुही यांच्या निधनाचा त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. ते अनेक दिवस आपल्या मित्रांशीही फारसं बोलत नव्हते. नेहमी हसत-खेळत राहणाऱ्या आणि आपल्या विनोदानं इतरांना आनंद देणाऱ्या लक्ष्मीकांत यांच्यासाठी हा काळ अत्यंत कठीण होता.

‘तिच्या अंगावरील एकही दागिना काढू नका!’

लेखिका आणि लक्ष्मीकांत यांच्या जवळच्या मैत्रीण वसुंधरा साबळे यांनी आपल्या ब्लॉगमध्ये या आठवणींचा उल्लेख केला होता. त्यांच्या लिखाणानुसार, रुही यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली तेव्हा लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या अंगावरील एकही दागिना काढू नये, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. या प्रसंगावेळी लक्ष्मीकांत आपल्या पत्नीच्या पार्थिवासमोर निःशब्द उभे होते. नेहमी बोलके असणारे लक्ष्मीकांत त्या क्षणी आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हते. त्यांच्या या निर्णयानं उपस्थितांनाही आश्चर्य वाटलं होतं.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language