
तनुश्री दत्ता आणि इम्रान हाशमी यांचं ‘आशिक बनाया आपने‘ हे गाणं आजही चाहत्यांच्या ओठांवर असतं. या गाण्यानं धुमाकूळ घातलेला. ‘आशिक बनाया आपने‘ या गाण्यामुळे तनुश्री दत्ताला प्रसिद्धी मिळाली. अशातच आता कोमल नाहटा यांच्या ‘गेम चेंजर्स: द म्युझिक सिरीज’मध्ये, हिमेश रेशमियानं ‘आशिक बनाया आपने’ या गाण्यामागील किस्सा सांगितला आहे.
हिमेश रेशमियानं सांगितला किस्सा
ट्रेड विश्लेषक कोमल नाहटा यांचा पॉडकास्ट ‘गेम चेंजर्स: द म्युझिक सिरीज’ एका नवीन सीझनसह परत आला आहे. या सीझनमध्ये प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि संगीत दिग्गजांचा सर्जनशील प्रवास, त्यांच्या प्रेरणा आणि त्यांच्या संगीतामागील न सांगितलेल्या कथांवर प्रकाश टाकला आहे. हिमेश रेशमिया या सिरीजच्या नवीन एपिसोडमध्ये सहभागी झाला. हिमेश रेशमियानं संगीतकार, गायक आणि अभिनेता म्हणून अनेक दशकांमध्ये असंख्य सुपरहिट गाणी दिली आहेत. शोमध्ये कोमल नाहटा यांच्यासोबतच्या संभाषणादरम्यान, त्यानं त्याच्या ‘आशिक बनाया आपने’ या आयकॉनिक गाण्यामागचा किस्सा सांगितला.
हिमेश म्हणाला की, ‘आशिक बनाया’ गाण्याच्या वेळी मी माझ्या मित्रांसोबत एका लाउंजमध्ये होतो. त्यावेळी माझा एक मित्र एकाच वेळी डान्स करत होता, दारू पित होता आणि रडतही होता. हे सगळं एकाच वेळी घडत होतं. मागे छान म्युजिक वाजत होतं, पण कदाचित त्याला कोणाची तरी आठवण आली असावी आणि त्यामुळे तो भावूक झाला. त्या क्षणी मला जाणवलेलं भावनिक नातं हेच या गाण्याची प्रेरणा ठरलं. तोपर्यंत प्रत्यक्षात असा प्रयोग कोणीही केला नव्हता. एक गाणं ज्याचे सूर खूप दुःखी, आणि वेदनांनी भरलेले आहेत, ते एका सुंदर आठवणीशी जोडलेलं आहे. त्याचे बोल असे असावेत की, प्रत्येकाला त्यांच्याशी रिलेट करता येईल. मग योग्य संगीत निर्मितीसह, एक ट्रॅक तयार केला पाहिजे, जो क्लबमध्ये लावण्यासाठीही योग्य असेल.’
‘तुम्ही गाण्याचा व्हिडिओ पाहिल्यास तो मुलगा वेदनांनी रडत आहे. क्लबमध्ये त्याच्या आजूबाजूला नाचणाऱ्या लोकांशी त्याचा संबंध नाही. तो त्याच्याच वेदनेच्या दुनियेत हरवून बसतो, संगीत वाजत असताना आणि धडधड सतत चालू असते. असं असूनही हे अतिशय भावनिक आणि वेदनादायी गाणं आहे. त्या काळात दु:खी गाण्यांचे रिमिक्स फारसे नव्हते. मी हे करणारी पहिली व्यक्ती आहे असं मी म्हणत नाही. मात्र, अशी संकल्पना आणि दृष्टी असणं हा माझ्यासाठी मोठा फायदा होता, याचं श्रेय माझ्या वडिलांना जातं.’ असं हिमेश शेवटी म्हणाला.
Source: TV9 Marathi Entertainment
