Hashtagintro

Jalgaon News | ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; शिरसाळा पाझर तलावाची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Bodwad Shirsala News

जळगाव : बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील पाझर तलावाचा सांडवा फोडून मोठ्या प्रमाणात मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन केल्याच्या प्रकरणाची अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकाराबाबत ‘दैनिक पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर जिल्हा परिषद जलसंधारण उपविभाग, मुक्ताईनगर यांनी शिरसाळा ग्रामपंचायतीला संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सात दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

शिरसाळा येथील पाझर तलावाच्या सांडव्याची तोडफोड करून तलाव परिसरातून मोठ्या प्रमाणात मुरूमाचे अनधिकृत उत्खनन करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या उत्खननामुळे तलावाचे मोठे नुकसान झाले असून, परिसरातील जलसाठ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे स्थानिक स्तरावर दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर ‘दैनिक पुढारी’ने या प्रकरणाचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध करून बेकायदेशीर उत्खननाचा प्रकार उजेडात आणला.

स्थळ पाहणीत सांडव्याच्या नुकसानीची पुष्टी

वृत्ताची दखल घेत जलसंधारण विभागाने संबंधित पाझर तलावाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या पाहणीत तलावाचा सांडवा फोडण्यात आल्याचे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित पाझर तलाव ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आलेला असल्याने त्याची देखभाल आणि सुरक्षिततेची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर उपविभागीय जलसंधारण अधिकारी (ल.पा.) निनाद वि. रत्नपारखी यांनी शिरसाळा ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ अन्वये आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलिसांत तक्रार, पंचनामा करण्याचे आदेश

मुक्ताईनगर जलसंधारण उपविभागाने जारी केलेल्या पत्रानुसार ग्रामपंचायतीला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • पाझर तलावाचा सांडवा फोडणे आणि बेकायदेशीर मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तातडीने लेखी तक्रार दाखल करावी.

  • महसूल विभाग आणि ग्रामपंचायत यंत्रणेच्या माध्यमातून घटनास्थळाचा पंचनामा करावा.

  • केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल, पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीची प्रत, पोचपावती आणि घटनास्थळाची छायाचित्रे सात दिवसांच्या आत उपविभागीय कार्यालयात सादर करावीत.

या आदेशाची प्रत जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल.पा.), जिल्हा परिषद, जळगाव यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीच्या कारवाईकडे लक्ष

जलसंधारण विभागाच्या आदेशामुळे शिरसाळा पाझर तलावाच्या नुकसानीचे प्रकरण आता अधिकृत कारवाईच्या टप्प्यावर पोहोचले आहे. मात्र, संबंधितांविरुद्ध ग्रामपंचायत प्रत्यक्षात कधी पोलिसांत तक्रार दाखल करते आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे बोदवड तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. तलावाच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language