
भारत-न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या पाच टी20 सामन्यांच्या सीरीजमधील चौथा सामना काल झाला. न्यूझीलंडने या मॅचमध्ये टीम इंडियावर विजय मिळवला. भारताने या मालिकेत 3-0 अशी आधीच आघाडी घेतली आहे. या सीरीजमध्ये न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स जबरदस्त बॅटिंग करतोय. त्याने चौथ्या टी20 मॅचनंतर मोठी झेप घेतली आहे. फिलिप्स या सीरीजमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने चार मॅचमध्ये 92 च्या सरासरीने 189.05 च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक 276 धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय अन्य कुठलाही फलंदाज सीरीजमध्ये 250 किंवा 200 धावांचा आकडा पार करु शकलेला नाही. मागच्या सामन्यातील शतकवीर अभिषेक शर्माची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. ऑकलंडमध्ये त्याची बॅट तळपली नाही. अभिषेक शर्माच्या चार सामन्यात 196 धावा झाल्या आहेत. टॉप 5 च्या लिस्टमध्ये अभिषेक एकमेव भारतीय फलंदाज आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला चौथ्या टी20 मॅचमधून पुन्हा एकदा ड्रॉप करण्यात आलं. टॉप 10 च्या लिस्टमधून तो बाहेर गेला आहे.
चालू टी20 सीरीजमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांमध्ये अभिषेक शर्मा एकमेव भारतीय आहे. याच लिस्टमध्ये तिसऱ्या नंबरवर न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेल आहे. त्याने चार सामन्यात 49 च्या सरासरीने 147 धावा केल्या आहेत. फिलिप्स प्रमाणे न्यूझीलंडचे अन्य फलंदाजही चांगल्या धावा करत आहेत. बेवन जेकब्स 135 धावांसह चौथ्या आणि फिन एलन 132 धावांसह पाचव्या स्थानावर आहे. या सीरीजमध्ये नंबर 1 आणि नंबर 5 च्या फलंदाजामध्ये मोठं अंतर दिसत आहे.
श्रेयस अय्यर कितव्या नंबरवर?
इशान किशन फिट होऊन टीममध्ये परतल्याने वैभव सूर्यवंशीला चौथ्या सामन्यातून ड्रॉप करण्यात आलं. त्याने दोन सामन्यात 49 रन्स केले आहेत. वैभव टॉप 10 फलंदाजांच्या यादीतून बाहेर गेला आहे. नमन धीरने या लिस्टमध्ये मोठी झेप घेतली आहे. 105 धावांसह या लिस्टमध्ये तो 6 व्या नंबरवर आहे. संजू सॅमसन 103 धावांसह सातव्या क्रमांकावर आहे. अभिषेक शर्मा, नमन धीर आणि संजू सॅमसन या तीन भारतीय फलंदाजांनी चालू टी20 सीरीजमध्ये 100 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तिलक वर्मा 93 धावांसह आठव्या स्थानावर आहे. मायकल ब्रेसवेलने चौथ्या टी20 मध्ये अर्धशतक ठोकलं. त्याने 82 धावा केल्या. त्यामुळे तो भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरला मागे टाकून 9 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. अय्यरने या सीरीजमध्ये म्हणाव्या तशा धावा केलेल्या नाहीत. 76 धावांसह तो 10 व्या क्रमांकावर आहे.
Source: TV9 Marathi Sports
