Hashtagintro

Belgaum News : चलो, संभाजी मैदान, सीमाभागात आज काळा दिन

बेळगाव : केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करताना बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह मराठीबहुल सीमाभाग १ नोव्हेंबर १९५६ रोजी अन्यायाने तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबला. त्याच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी (दि. १) काळा दिन पाळण्यात येणार आहे. मराठी भाषिकांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवून काळा दिन गांभीर्याने पाळावा, सकाळी ९ वाजता संभाजी उद्यानापासून निघणाऱ्या फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

संभाजी उद्यानापासून फेरीला सुरुवात झाल्यानंतर शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहापूर परिसरात फिरून मराठा मंदिराजवळ फेरीची सांगता होईल. मराठा मंदिरात सभा होईल. फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करावेत, काळे झेंडे घेऊन फेरीत सहभागी व्हावे, फेरी शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, तसेच पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शहर समिती, तालुका समितीने केले आहे.

काळा दिनाबाबत गेल्या काही दिवसांपासून शहरात जनजागृती करण्यात आली आहे. त्यानुसार बेळगाव शहर आणि तालुक्याच्या विविध भागांतील कार्यकर्त्यांनी फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. खानापूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, तर निपाणी येथे निषेध फेरी काढून जाहीर सभा होणार आहे.

…अशी निघणार निषेध फेरी

संभाजी उद्यानापासून सुरुवात. तेथून तानाजी गल्ली रेल्वे गेट, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, शिवाजी रोड, कोनवाळ गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, हेमू कलानी चौक, ताशीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, गणेश चौक, जेड गल्ली, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, खडे बाजार, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कलमार्गे मराठा मंदिर येथे सांगता.

हिंडलगा कारागृहात अन्‍नत्याग सत्याग्रह

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके व सरचिटणीस मनोहर हुंदरे हे हिंडलगा कारागृहात काळा दिनानिमित्त एक दिवस अन्‍नत्याग सत्याग्रह करणार आहेत. काळा दिनाच्या तोंडावर शेळके व हुंदरे यांना अटक झाली. त्यांना अजून जामीन मिळालेला नाही. त्यामुळे काळा दिनाच्या फेरीत प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसल्याने हे दोघेही रविवारी कारागृहात एकदिवसीय अन्‍नत्याग सत्याग्रह करणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना अस्मिता दाखवा

म. ए. समितीची ताकद संपली आहे. त्यांच्या काळा दिनाला साडेतीनशे लोकही सहभागी नसतात, अशी टीका जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली आहे. ही टीका युवावर्गाच्या जिव्हारी लागली असून, सोशल मीडियावर साडेतीनशे नव्हे, हजारोंच्या संख्येने येऊ, काळा दिनाची फेरी यशस्वी करू, असा निश्चय व्यक्त करण्यात येत आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language