हिंगोली जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे हिंगोली जिल्हाप्रमुख गोपू पाटील (उर्फ अभय सावंत) आणि कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार संतोष टारफे हे आज शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाणे येथे सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. या दोन प्रमुख नेत्यांसह माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, विविध गावांमधील शेकडो कार्यकर्ते आणि मार्केट कमिटीचे काही सदस्यही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे गटात सामील होणार आहेत.
या पक्षप्रवेशामुळे हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, माजी आमदार संतोष टारफे, जे कधी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात लढले होते, ते आता बांगर यांच्याच नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या पक्षबदलामुळे हिंगोली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
Source: TV9 Marathi National
