Hashtagintro

पश्चिम रेल्वेच्या 76व्या स्थापना दिनानिमित्त खार रोड स्थानकात ऐतिहासिक प्रदर्शन; 7 नोव्हेंबरपर्यंत रेल्वेचा गौरवशाली प्रवास पाहण्याची संधी

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या 76व्या स्थापना दिनानिमित्त खार रोड रेल्वे स्थानकाच्या एलिव्हेटेड डेकवर विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडवणारे हे प्रदर्शन 5 ते 7 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांनी प्रदर्शनाला भेट देत रेल्वेप्रेमींशी संवाद साधला.

1951 पासूनचा पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक प्रवास
पश्चिम रेल्वेची स्थापना 5 नोव्हेंबर 1951 रोजी तत्कालीन BB&CI रेल्वेचे सौराष्ट्र, राजपूताना, जयपूर आणि अन्य स्टेट रेल्वेंमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर झाली. सुरुवातीला 29 मैलांच्या रेल्वे मार्गावर असलेले पश्चिम रेल्वेचे नेटवर्क आज चार राज्यांमध्ये 6,000 पेक्षा अधिक रूट किलोमीटरपर्यंत विस्तारले आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या प्रदर्शनाचा उद्देश रेल्वेच्या ऐतिहासिक वारशाचा उत्सव साजरा करणे आणि प्रवाशांना तिच्या विकासप्रवासाची माहिती देणे हा आहे.

रेल्वेच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांचे प्रदर्शन
प्रदर्शनातील माहितीफलकांवर पश्चिम रेल्वेच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी सादर करण्यात आल्या आहेत. 1864 मध्ये उत्राण ते ग्रँट रोड रेल्वे मार्ग सुरू झाल्यापासूनच्या प्रवासाचा आढावा यात घेण्यात आला आहे. यामध्ये 9 डब्यांच्या उपनगरीय लोकलची सुरुवात, मुंबई–नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस, जगातील पहिली महिला विशेष उपनगरीय ट्रेन, भारतातील पहिली 15 डब्यांची लोकल आणि पहिल्या पूर्णपणे वातानुकूलित उपनगरीय ट्रेनच्या प्रारंभाचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेच्या अलीकडील उपलब्धींमध्ये वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस आणि नमो भारत रॅपिड रेलच्या सुरुवातीची माहितीही प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/05/central-railway-completes-75-glorious-years-grand-heritage-walk-celebrated-at-chhatrapati-shivaji-maharaj-terminus/

वाफेचे इंजिन, लोकलचे मॉडेल आणि AI फोटो बूथ आकर्षण
प्रदर्शनात वाफेच्या इंजिनाचे आणि लोकल ईएमयूचे कार्यरत मॉडेल्स रेल्वेप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय, अभिनव AI फोटो बूथच्या माध्यमातून प्रवाशांना जुन्या काळातील पश्चिम रेल्वेच्या वातावरणात स्वतःचे छायाचित्र पाहण्याची संधी मिळत आहे. यासाठी केवळ QR कोड स्कॅन करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेच्या इतिहासावर आधारित प्रश्नमंजुषेचेही आयोजन करण्यात आले असून, रेल्वेप्रेमींना आपले ऐतिहासिक ज्ञान तपासता येणार आहे.

आधुनिकतेकडे वाटचाल; प्रवासी सुविधांवर भर
पश्चिम रेल्वे आपल्या गौरवशाली वारशाचा अभिमान बाळगत सुरक्षित, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. आधुनिकीकरण, तंत्रज्ञानातील प्रगती आणि प्रवासी सुविधांवर सातत्याने भर देत अधिक कार्यक्षम आणि प्रवाशांसाठी अनुकूल रेल्वे व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने पश्चिम रेल्वेची वाटचाल सुरू आहे.
प्रदर्शनाची माहिती:

स्थळ: खार रोड रेल्वे स्थानक, एलिव्हेटेड डेक
कालावधी: 5 ते 7 नोव्हेंबर 2026

वेळ: सकाळी 9 ते सायंकाळी 7

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language