Hashtagintro

आर्थिक अडचणीमुळे एकही बालक शस्त्रक्रियेपासून वंचित राहणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ठाणे: आर्थिक संकटामुळे कोणत्याही निष्पाप बालकाचे उपचार थांबणार नाहीत. कॉक्लिअर इम्प्लांट आणि हृदय शस्त्रक्रियांच्या प्रतीक्षेत असलेल्या एक हजार बालकांवर तातडीने उपचार केले जातील. एवढेच नव्हे, तर श्रीनगरमधील 72 गरजू बालकांच्या शस्त्रक्रियांची संपूर्ण जबाबदारीही आम्ही स्वीकारली असून, उपचारांमध्ये पैशांची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हृदयशस्त्रक्रिया आणि कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या बालकांसह त्यांच्या पालकांसाठी आयोजित दिवाळी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांच्या पुढाकारातून दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आयोजित या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी संकटाची असताना या बालकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद वेगळाच असल्याचे त्यांनी सांगितले. 11 कुटुंबांनी कथन केलेले अनुभव हृदयद्रावक होते. मुलांना ऐकू येत नाही, बोलता येत नाही किंवा हृदयात छिद्र असल्याचे समजल्यावर पालकांवर होणारा मानसिक आघात शब्दांत व्यक्त करता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुकपणे म्हणाले.

रुग्णाचे निदान करण्यापासून ते थेट एअर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यापर्यंत आणि शस्त्रक्रियेनंतरच्या नियमित फॉलोअपपर्यंतची सर्व जबाबदारी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाऊंडेशन आणि मंगेश चिवटे यांची वैद्यकीय मदतनीस टीम गेली नऊ वर्षे अविरतपणे सांभाळत आहे. या टीमच्या माध्यमातून कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या एका मुलीने ‘आयआयटी’ तर दुसऱ्या मुलीने थेट ‘इस्रो’पर्यंत यशस्वी भरारी घेतली आहे. शस्त्रक्रियेच्या अनुभवावर आधारित आदित्य ठोसरने लिहिलेल्या ‘माय वर्ल्ड ऑफ साऊंड’ या पुस्तकाचे आणि ठाणे महापालिकेतील मुलांनी सादर केलेल्या नाटकाचे विशेष कौतुक करत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुलांच्या कलागुणांना व जिद्दीला सर्वांनी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

ठाणे महानगरपालिकेत यापूर्वी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून सुमारे 50 ते 60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन अत्यंत महागड्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. ठाण्यात राबवण्यात आलेली ही प्रभावी ‘अर्ली डिटेक्शन’ यंत्रणा आता राज्यातील इतर सर्व महापालिकांमध्येही सुरू केली जाईल; यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. याशिवाय, यकृत प्रत्यारोपण आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांवर ठाण्यात पूर्णपणे मोफत, म्हणजेच ‘कॅशलेस’ उपचार देणारी रुग्णालये उभारली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

https://www.prahaar.in/2026/11/06/major-relief-for-drought-affected-people-cm-relief-fund-cell-now-extended-directly-to-the-taluka-level-with-a-dedicated-medical-officer-appointed/

ठाण्यातील रक्तदानाचा हा ऐतिहासिक वारसा आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केला असून, आजही दरवर्षी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री हजारो रक्तदाते यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. ठाण्यात काही वर्षांपूर्वी नवरात्रोत्सवात झालेल्या शिबिरात तब्बल 11 हजार नागरिकांनी रक्तदान करण्याचा ऐतिहासिक विक्रम केला होता. हाच सेवेचा धागा पुढे नेऊन पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारातून काश्मीरमधील लष्करी रुग्णालयात सलग दोन वर्षे प्रत्येकी एक हजार सैनिकांसाठी व नागरिकांसाठी रक्तदान करण्यात आले. केवळ रक्तदानच नव्हे, तर कोविड संकट असो की केरळ, कोल्हापूर आणि सांगलीतील भीषण पूरस्थिती, आमची डॉक्टरांची टीम नेहमीच पहिल्या फळीत मदतीसाठी धावून गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सामाजिक कार्याचा गौरव केला.

या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. आशुतोष सिंह, डॉ. अमोल गीते, डॉ. रमेश काझगी, डॉ. श्रीनिवास, डॉ. उपल, डॉ. आशिष भुमकर, डॉ. ऋषिकेश वैद्य, डॉ. सुधीर कदम, डॉ. आदित्य मानके, डॉ. निखिल जाधव, डॉ. मिनी बोधनीवाला, डॉ. जितेंद्र हरियान, डॉ. संतोष शेट्टी, डॉ. नीरज उत्तम, डॉ. मनोज सिंगल होते.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language