Hashtagintro

Ratnagiri News| दिवाळीत भेसळखोरांना दणका! १.२७ लाखांचे अन्नपदार्थ जप्त

रत्नागिरी : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्‍न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. या विशेष तपासणी मोहिमेत रत्नागिरी शहर, ग्रामीण भाग आणि दापोली परिसरातील विविध आस्थापनांची तपासणी करून मिठाई, खवा, खाद्यतेल, फरसाण, बेसन, मैदा आणि कोकम आगळ यांसह विविध अन्‍नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. सहा कारवायांमध्ये जप्त केलेल्या पदार्थांची एकूण दर्शनी किंमत १ लाख २७ हजार २८० रुपये असून, ३२ अन्‍न नमुने विश्लेषणासाठी संकलित करण्यात आले आहेत.

दीपावली सणाला सुरुवात झाली असून बाजारपेठीही सजल्‍या आहेत. रत्‍नागिरीकर बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी करीत आहेत. दीपावलीच्या काळात मिठाई आणि फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. याच काळात अन्‍नपदार्थांमध्ये भेसळ, प्रतिबंधित कृत्रिम रंगांचा वापर तसेच निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्‍न व औषध प्रशासनाने ही विशेष मोहीम राबविली. तपासणीदरम्यान रत्नागिरी शहरात टर्काईज रंगाचा सहा किलो काजू रोल जप्त करण्यात आला. त्याची किंमत १० हजार ३२० रुपये आहे.

दापोली येथे १० किलो म्हैसूर पाक आणि १३ किलो मलाई बर्फी असा ११ हजार ५२० रुपयांचा साठा जप्त केला. रत्नागिरी शहरात १८ किलो खवा आणि १० किलो सुटे खाद्यतेल असा ७ हजार ८८० रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला. जप्त केलेल्या पदार्थांसह संकलित अन्‍न नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार संबंधित व्यावसायिकांविरोधात अन्‍न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language