
Old Monk Resale In Maharashtra: मद्यप्रेमींसाठी आता एक बातमी समोर येत आहे. दिवाळीत मद्यप्रेमींना गुड न्यूज मिळाली आहे. अत्यंत लोकप्रिय असलेल्या ओल्ड मंक रमची चव आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा चाखायला मिळणार आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असलेली ओल्ड मंकची विक्री लवकरच सुरु होण्याच्या तयारीत आहे. कंपनी आता नव्या लेबलमध्ये हे उत्पादन बाजारात आणण्यासाठी सज्ज आहे. बाटलीच्या लेबलवरील मजकुरात बदल करण्यास कंपनीने आता तयारी दर्शवली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायलयातील याचिका मागे घेतल्याने विक्रीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने मे महिन्यात खोपोली येथील कारखान्याची पाहणी केली होती. ओल्ड मंक बनवण्यासाठी न्यूट्रल स्पिरिट्स आणि रम फ्लेवरिंगचा वापर होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे हे उत्पादन केवळ रम म्हणून विकता यापुढे येणार नाही. असा आक्षेप प्राधिकरणाने घेतला होता. शिवाय ‘७ इयर्स ओल्ड ब्लेंडेड’ हे वर्णनही चुकीचे आहे. ते लाकडी पिंपात मुरवलेले नाही, असं म्हणत विक्री रोखली होती.
FSSAI च्या नियमांनुसार ठरवून दिलेल्या तांत्रिक घटकांचा वापर करुनच फ्लेवर देण्यास मान्यता आहे. मात्र, तपासात असे दिसून आले की ओल्ड मंक बनवताना बाहेरुन कृत्रिम फ्लेवर्स मिसळून हे मद्य ‘स्टँडर्ड अल्कोहोलिक ड्रिंक’ म्हणून बाजारात विकले जायचे. सर्वात गंभीर म्हणजे, बाटल्यांच्या लेबलवर या कृत्रिम मिश्रणाचा (आर्टिफिशियल फ्लेवर) कोणताही उल्लेख करायचे नाही. जी उघडउघड ग्राहकांची फसवणूक मानली जाते.
या निर्णयाविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितलेली. मात्र, न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर, कंपनीने लेबलवर ‘अतिरिक्त स्वाद’ ठळकपणे छापण्यास आणि ‘७ वर्षे जुने’ हे वकर्णन वगळण्यास सहमती दर्शवलेली आहे. २ नोव्हेंबर रोजी कंपनीने याचिका मागी घेतली होती.
मागील पाच महिन्यांपासून ओल्ड मंकची विक्री थांबल्याने राज्य सरकारला सुमारे ३५० कोटींच्या अबकारी महसुलाचा फटका बसलेला आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी सर्व प्रकारच्या मद्यविक्रीमधून २९,९५७ कोटींचा महसूल मिळालेला. आता नव्या पॅकिंगसह ओल्ड मंकला पुन्हा बाजारात रिएन्ट्री मिळाली आहे.
Source: TV9 Marathi National
