Hashtagintro

Devendra Fadnavis: लोहारी सावंग्यात शेतकऱ्याच्या कुटुंबासोबत जेवण अन् रात्रभर मुक्काम; मुख्यमंत्र्यांनी कशी साजरी केली दिवाळी?

Devendra Fadnavis Diwali with Farmers

नागपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला भक्कम धीर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षीची दिवाळी थेट बळीराजाच्या घरी साजरी केली. कडक ऊन पडलेले असताना, उन्हाची तमा न बाळगता मुख्यमंत्र्यांनी रविवारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि ‘सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे’ असा ठाम विश्वास शेतकऱ्यांना दिला.

शेतकऱ्याच्या घरी साधे जेवण अन् भजनाचा सूर

मुख्यमंत्र्यांनी ७ नोव्हेंबरच्या सायंकाळीच नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा हे गाव गाठले. तेथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी घरातील महिलांनी बनवलेली भाकर, चपाती, आलू-वांग्याची भाजी, वांग्याचे भरीत, वालाच्या शेंगांची भाजी आणि वरण-भाताचा मुख्यमंत्र्यांनी अत्यंत साधेपणाने आस्वाद घेतला. जेवणानंतर रात्री ते ग्रामस्थांसोबत भजनात सहभागी झाले.

“आजवर एकाही मुख्यमंत्र्याला आम्ही डोळ्यांनी पाहिले नव्हते; पण फडणवीस साहेबांनी थेट आमच्या गावात मुक्काम करून आम्हाला आनंदाचा सुखद धक्का दिला,” अशी भावना लोहारी सावंगा येथील महिलांनी व्यक्त केली. “राज्यातील लाडक्या बहिणींच्या पाठीशी देवाभाऊ नेहमीच खंबीरपणे उभे राहिले आहेत. आमच्या छोट्याशा गावात त्यांनी दिवाळीत केलेला मुक्काम हीच आमच्यासाठी सर्वात मोठी भाऊबीज भेट आहे,” अशा शब्दांत महिलांनी आपला आनंद व्यक्त केला.

भर उन्हात मुख्यमंत्र्यांची शेतात पाहणी

मुक्कामानंतर आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी परिसरातील सिंचन प्रकल्पांना भेटी दिल्या. सोनेगाव रिठी येथील शेतकरी दिलीप सरोदे यांच्या शेतात जाऊन त्यांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

विंधन विहिरींवरील बंदी १५ डिसेंबर पर्यंत शिथील : फडणवीस यांची घोषणा

“सध्याची दुष्काळी स्थिती पाहता विशेष बाब म्हणून केवळ शेतीकामाकरीता विंधन विहिरींवरील बंदी येत्या १५ डिसेंबर पर्यंत उठविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी केली. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी विविध ग्रामपंचायत सरपंचांशी संवाद साधला. फडणवीस यांनी शनिवारी या गावात मुक्काम करून येथेच दिवाळी साजरी केली.

आज सकाळी पुढील दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यंदा दुष्काळामुळे जलसंकट असून, शेतातील पिके मातीमोल होण्याची भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विंधन विहिरींचे खोलीकरण किंवा नवीन विंधन विहिरी करणे यावरील बंदी उठविणे सरकारसाठी थोडे अडचणीचे आहे, मात्र विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांना परवानगी घ्यावी लागेल तसेच बंदी उठविण्याचा निर्णय सरसकट नाही, झाडे जगविण्यासाठी आवश्यक तेथेच परवानगी असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे, मात्र पशू दवाखाने नाही, अशी व्यथा अनेक प्रतिनिधींनी मांडली. जलजीवन मिशनच्या कामांबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, पुरेसे पैसे न मिळाल्याने काही कामे अपूर्ण आहेत, मात्र आता ती प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. जेथील कामे ७५ टाक्यांच्यावर पूर्ण झाली आहेत, तेथे तातडीने निधी उपलब्ध करून ती कामे पूर्ण केली जातील. अन्य ठिकाणची कामेही टप्प्यात पूर्ण केली जातील.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language