Hashtagintro

Goa Abhila Kavalekar theatre journey profile|रंगभूमीवर स्वतःला घडवणारी अभिला कवळेकर

रंगयात्रा- निवृत्ती शिरोडकर

पेडणे : पहिल्या नाटकाचा प्रयोग संपतो. रंगमंचावर उभे राहताना मनात असलेली भीती प्रेक्षकांच्या कौतुकाने हळूहळू विरघळते आणि मनात एक नवा विश्वास निर्माण होतो…’आपणही हे करू शकतो!’ युवा अभिनेत्री अभिला कवळेकर हिच्यासाठी पहिल्या प्रयोगानंतर मिळालेली प्रेक्षकांची दाद अशीच मोलाची ठरली. या कौतुकाने तिला आनंद मिळाला आणि पुढील प्रयोग अधिक चांगला करण्याची प्रेरणाही मिळाली. वयाच्या पंचविसाव्या वर्षी ती रंगभूमीवर आपली ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे.

अभिलाच्या नावावर सध्या अनेक नाटकांचा अनुभव नसला, तरी पहिल्याच नाटकाचे सुमारे तीस प्रयोग करण्याची संधी तिला मिळाली आहे. प्रत्येक प्रयोगातून काहीतरी नवे शिकण्याची आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तिची तयारी जाणवते. ‘लंडन रिटर्न्स’ हे तिचे पहिले नाटक केवळ अभिनयाची संधी ठरली नाही, तर स्वतःला ओळखण्याचा आणि घडवण्याचा अनुभवही ठरले आहे.

अभिलाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. एकपात्री अभिनय आणि वेशभूषा सादरीकरणातून या आवडीला दिशा मिळाली. एकट्याने प्रेक्षकांसमोर उभे राहणे, संवाद सादर करणे आणि एखादे पात्र साकारण्याचा प्रयत्न करणे, या अनुभवांतून तिचा आत्मविश्वास वाढत गेला. सुरुवातीच्या या सादरीकरणांनीच रंगभूमीवर आणखी काही करण्याची इच्छा तिच्या मनात निर्माण केली.

पुढे ‘कायचे काय’ या एकांकिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर वयाच्या चोविसाव्या वर्षी ‘लंडन रिटर्न्स’ या नाटकातून तिच्या नाट्यप्रवासाला नवे वळण मिळाले. सध्या ती याच नाटकात काम करत असून, प्रत्येक प्रयोगातून अभिनयाचे नवे पैलू अनुभवत आहे. सुरुवातीला रंगमंचावर उभे राहण्याचा संकोच होता; मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि सहकलाकारांचे मार्गदर्शन यामुळे तिचा आत्मविश्वास वाढत गेला.

अभिलाने कोणत्याही अभिनय संस्थेतून औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नाही. प्रत्यक्ष नाटकात काम करताना, सहकलाकारांचे अनुभव ऐकताना आणि स्वतःच्या सादरीकरणातील त्रुटी सुधारताना ती अभिनय शिकत गेली. नाटकाच्या प्रक्रियेत भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकता येते, असे तिचे मत आहे. त्यामुळे शिकण्याची तयारी आणि निरीक्षणाची वृत्ती यांना ती महत्त्व देते.

प्रत्येक प्रयोग मला काहीतरी नवीन शिकवतो आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी देतो, असे अभिला सांगते. तिच्यासाठी अभिनय म्हणजे केवळ संवाद पाठ करून रंगमंचावर सादर करणे नाही. पात्राच्या भावना समजून घेणे, त्याच्या स्वभावानुसार आवाजातील चढ-उतार साधणे आणि देहबोलीतून त्याचे व्यक्तिमत्त्व उभे करणे, या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. संवाद, आवाज, देहबोली आणि भावाभिनय यांचा योग्य समन्वय साधल्यासच पात्र प्रेक्षकांसमोर जिवंत होते, अशी तिची समज आहे.

‘लंडन रिटर्न्स’ हे नाटक तिच्या मनाच्या विशेष जवळ आहे. पहिले नाटक असल्यामुळे त्याच्याशी जिव्हाळ्याचे नाते आहेच; शिवाय या नाटकाने तिला अभिनयातील बारकावे समजून घेण्याची संधी दिली. स्वतःच्या क्षमतांचा अंदाज घेता आला आणि कलाकार म्हणून स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. सुमारे तीस प्रयोगांच्या अनुभवातून रंगमंचावरील आत्मविश्वासासोबतच प्रत्येक प्रयोगात नवे काही करण्याची उमेद तिला मिळाली.

अभिनयाची आवड जोपासतानाच अभिला नोकरीची जबाबदारीही सांभाळते. कामाच्या वेळा, तालमी आणि नाटकांचे प्रयोग यांची सांगड घालण्यासाठी तिला नियोजन करावे लागते. अनेकदा दिनक्रम बदलावा लागतो, तर कधी स्वतःसाठी राखून ठेवलेल्या वेळेत तडजोड करावी लागते. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या तालमी आणि प्रवास यामुळे थकवाही जाणवतो. मात्र रंगमंचावर काम केल्यानंतर मिळणारे समाधान तिला पुन्हा नव्या उत्साहाने काम करण्याचे बळ देते.

या प्रवासात आई-वडिलांची साथ तिच्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी तिच्या आवडीवर आणि स्वप्नांवर विश्वास ठेवला. त्यामुळे नोकरी सांभाळून अभिनयाची वाट चालणे तिला शक्य झाले. एखाद्या कलाकाराच्या जडणघडणीत कुटुंबाचा पाठिंबा किती महत्त्वाचा असतो, याची जाणीव अभिलाच्या अनुभवातून होते. जवळच्या माणसांनी दाखवलेला विश्वास हा पुढे जाण्यासाठी मोठा आधार ठरतो, असे तिला वाटते.

ग्रामीण भागातील स्त्री कलाकार म्हणून सुरुवातीला विशेष अडथळ्यांचा सामना करावा लागला नसल्याचे अभिला सांगते. स्त्री आणि पुरुष कलाकारांच्या अडचर्णीमध्येही तिला स्वतःच्या अनुभवात विशेष फरक जाणवलेला नाही. मात्र प्रत्येक मुलीला कुटुंब आणि समाजाकडून सारखे प्रोत्साहन मिळतेच असे नाही, याची तिला जाणीव आहे. मुलींच्या कलागुणांवर विश्वास ठेवून त्यांना संधी दिली पाहिजे, असे तिचे मत आहे.

स्त्रियांनी नाटकात काम करण्याविषयी समाजाचा दृष्टिकोन हळूहळू सकारात्मक होत असल्याचे तिचे निरीक्षण आहे. तरी ग्रामीण भागात अधिक जागृती आणि प्रोत्साहनाची गरज आहे. नवोदित कलाकारांसाठी नाट्यस्पर्धा, कार्यशाळा आणि प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन व्हावे, नाट्यसंस्थांना आर्थिक मदत मिळावी आणि ग्रामीण भागातील नाट्यप्रयोगांना चालना मिळावी, अशी तिची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील अनेक कलाकारांकडे कला आणि क्षमता असते; मात्र योग्य व्यासपीठ आणि संधी मिळाल्यास त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल, असे ती मानते.

डिजिटल मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत आणणे हे रंगभूमीसमोरील आव्हान असल्याचे अभिला मान्य करते. मोबाईलवर सहज उपलब्ध होणाऱ्या मनोरंजनाच्या पर्यायांमुळे प्रेक्षकांचा वेळ विभागला जात आहे. अशा परिस्थितीत रंगभूमीला आपले वेगळेपण जपावे लागणार आहे. मात्र प्रत्यक्ष नाटकाच्या प्रयोगात कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात निर्माण होणारे नाते इतर माध्यमांत अनुभवता येत नाही. जिवंत अभिनयातून साधला जाणारा संवाद हीच रंगभूमीची खरी ताकद आहे, असा तिचा विश्वास आहे.

कलाप्रवासात अभिलाला विविध प्रसंगी सन्मान मिळाले आहेत. पुरस्कारांमुळे आपल्या कामाची दखल घेतली गेल्याची जाणीव होते आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. मात्र आपण साकारलेले पात्र प्रेक्षकांच्या मनाला भिडले आणि त्यांच्या प्रतिसादातून त्याची पावती मिळाली, तर त्याचे समाधान वेगळेच असते. पहिल्या प्रयोगानंतर मिळालेली दाद तिने आजही जपून ठेवली आहे.

रंगभूमीने अभिलाला केवळ अभिनयाची संधी दिली नाही तर आत्मविश्वास, शिस्त आणि स्वतःला व्यक्त करण्याची ताकदही दिली. वेगवेगळ्या पात्रांच्या भावना समजून घेताना तिच्यातील संवेदनशीलता वाढली. अभिनय हा स्वतःला शोधण्याचा आणि घडवण्याचा प्रवास असल्याचे ती मानते. त्यामुळे प्रत्येक प्रयोगाकडे ती शिकण्याची नवी संधी म्हणून पाहते.

विविध भूमिका साकारण्याचे स्वप्न

पुढील काळात वेगवेगळ्या स्वरूपाच्या भूमिका साकारण्याची अभिलाची इच्छा आहे. स्त्रीच्या भावविश्वाचे विविध पैलू उलगडणारी आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणारी पात्रे तिला साकारायची आहेत. अधिकाधिक अनुभव मिळवत अभिनयक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे स्वप्न ती बाळगते. त्यासाठी सातत्याने शिकत राहणे आणि स्वतःच्या अभिनयात सुधारणा करणे यावर तिचा भर आहे

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language