Hashtagintro

IND vs SA : स्मृती मानधनाकडे नेतृत्वाची धुरा, जेमिमाचे कमबॅक! द. आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला कसोटी, वनडे, T20 संघांची घोषणा

मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची सोमवारी (९ नोव्हेंबर) घोषणा करण्यात आली. आगामी दौऱ्यातील कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारच्या मालिकांसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला असून, स्टार फलंदाज स्मृती मानधनाकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

दुखापतीतून सावरल्यानंतर मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघात दिमाखदार पुनरागमन केले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांदरम्यान ९ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

निवड समितीने काही महत्त्वाचे फेरबदल करताना फिरकीपटू श्रेयंका पाटीलला टी-२० संघातून वगळले आहे. संघात दीप्ती शर्मासह श्री चरणी आणि प्रेमा रावत यांच्या रूपात फिरकीचे सक्षम पर्याय उपलब्ध असल्याने श्रेयंकाला संधी मिळालेली नाही. दुसरीकडे, झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारी वेगवान गोलंदाज जिंतिमोनी कलिता हिलाही टी-२० संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, एकदिवसीय संघात तिने आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले असून, कसोटी संघातही तिला संधी देण्यात आली आहे.

भारतीय कसोटी संघात कर्णधार स्मृती मानधनासह उपकर्णधार दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, यष्टिरक्षक रिचा घोष, यास्तिका भाटिया, श्री चरणी, स्नेह राणा, क्रांती गौर, नंदनी शर्मा, जिंतिमोनी कलिता आणि सयाली सातघरे यांचा समावेश करण्यात आला आहे. एकदिवसीय संघातही याच प्रमुख खेळाडूंना संधी देण्यात आली असून फिरकी विभागात वैष्णवी शर्माचा समावेश करण्यात आला आहे.

टी-२० संघात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली शेफाली वर्मा उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे. या संघात जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, रिचा घोष (यष्टिरक्षक), जी. कमलिनी (यष्टिरक्षक), अनुष्का शर्मा, दीप्ती शर्मा, श्री चरणी, प्रेमा रावत, अमनजोत कौर, क्रांती गौर, नंदनी शर्मा, वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी आणि सयाली सातघरे यांना पाचारण करण्यात आले आहे.

कसोटी-वनडे मालिका

या दौऱ्याची सुरुवात ९ डिसेंबर रोजी गकेबरहा येथे होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याने होणार आहे.

त्यानंतर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना बुधवार, १६ डिसेंबर रोजी पार्ल येथे, दुसरा सामना शनिवार, १९ डिसेंबर रोजी केपटाऊन येथे, तर तिसरा व अंतिम एकदिवसीय सामना मंगळवारी, २२ डिसेंबर रोजी ब्लूमफॉन्टेन येथे पार पडेल.

टी२० मालिकेने समारोप

दौऱ्याचा समारोप तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने होणार असून, पहिला टी-२० सामना शनिवार, २६ डिसेंबर रोजी बेनोनी येथे रंगणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा आणि तिसरा टी-२० सामना अनुक्रमे २९ आणि ३० डिसेंबर रोजी पॉचेफस्ट्रूम येथे खेळवला जाईल. आगामी स्पर्धांच्या दृष्टीने हा दक्षिण आफ्रिका दौरा भारतीय महिला संघासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आणि महत्त्वाचा मानला जात आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language