Hashtagintro

Mumbai Airport : मुंबईतील एकही विमानउड्डाण नवी मुंबईत स्थलांतरित होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टर्मिनल-१च्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारला पत्र

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करण्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पूर्णविराम दिला. मुंबई विमानतळावरील एकही विमान नवी मुंबईत हलविण्यात येऊ नये, अशी भूमिका घेत त्यांनी यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. दोन्ही विमानतळांनी कोणत्याही स्थलांतराशिवाय स्वतंत्रपणे आणि आपापल्या पूर्ण क्षमतेनुसार कार्यरत राहावे, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. ( Mumbai Airport)
https://www.prahaar.in/2026/11/11/new-vande-bharat-route-big-news-for-vande-bharat-passengers-the-train-will-now-run-on-the-madgaon-yesvantpur-route/
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-१चे नूतनीकरण आणि पुनर्विकास करण्यात येणार आहे. या कामाच्या काळात मुंबईतून उड्डाण करणारी तसेच मुंबईत येणारी काही आंतरराष्ट्रीय विमाने नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्याची योजना असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानुसार, मुंबई विमानतळावरून बहरीन, दोहा, जेद्दा, काठमांडू, कुवेत, मस्कत आणि रियाध यांसह १४ प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांसाठीची उड्डाणे नवी मुंबईत हलविण्याचा प्रस्ताव होता. मात्र, मुंबईतून विमानप्रवासाची सुविधा उपलब्ध असताना प्रवाशांना नवी मुंबईपर्यंत जाण्याची वेळ येणार असल्याने या प्रस्तावाबाबत नाराजी व्यक्त होत होती. विमान कंपन्यांनीही या स्थलांतराला विरोध दर्शविला होता.
या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी टर्मिनल-१च्या पुनर्विकासासाठी पर्यायी मार्ग सुचविला आहे. सध्याचे टर्मिनल-१ए पाडून त्याचा पुनर्विकास करण्यापूर्वी त्याला पर्याय म्हणून नवीन टर्मिनल-१बी उभारण्यात यावे. त्यानंतर टर्मिनल-१ए वरील उड्डाणे नव्या १बी मध्ये स्थलांतरित करावीत. सध्याचे टर्मिनल-१ए रिकामे झाल्यानंतर ते पाडून टप्प्याटप्प्याने त्याचा पुनर्विकास करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी पत्रातून केली आहे. या पर्यायामुळे टर्मिनलच्या पुनर्विकासाचे काम सुरू असतानाही मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलविण्याची गरज भासणार नाही, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language