
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे जिव्हाळाचा विषय असतो. या सामन्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आता पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील थरार अनुभवायला मिळणार आहे. U19 आशिया कप 2026 च्या अंतिम सामन्यात आज १४ नोव्हेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.
युवा टीम इंडियासमोर पराभवाचा वचपा घेण्याचे आव्हान असणार आहे. साखळी फेरीत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाला अंतिम सामन्यात आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. आता युवा भारतीय खेळाडू पाकिस्तानला नमवून आशिया कपची ट्रॉफी आपल्या नावावर करणार का, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यापूर्वी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला होता. त्यामुळे अंतिम फेरीत त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय युवा संघाकडे असणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान U19 फायनल कधी होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील U19 आशिया कप 2026 चा अंतिम सामना आज, शनिवार, 14 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
सामना किती वाजता सुरू होईल?
या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. त्याआधी सकाळी 10 वाजता नाणेफेक होणार आहे.
भारत-पाकिस्तान फायनल कुठे रंगणार?
हा सामना ओमानमधील अल अमरात येथील अल अमरात क्रिकेट ग्राउंड (मिनिस्ट्री टर्फ 2) येथे खेळवण्यात येणार आहे.
सामना लाइव्ह कुठे पाहता येणार?
भारत-पाकिस्तान U19 फायनलचा थरार टीव्हीवर पाहू इच्छिणाऱ्या चाहत्यांसाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. तर मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर सामना पाहण्यासाठी SonyLIV या अॅप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंगची सुविधा असेल.
भारत आणि पाकिस्तानचे संभाव्य संघ
भारत U19 संघ:
लक्ष्य राजेश रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), अर्जुन राजपूत, ईशान सूद, काव्या पटेल, मनाल चौहान, मोहित उलवा, यशवीर गौड, व्ही. के. विनीत, यशबर्धन चौहान, रजत बघेल, शविन विनोद, आर्यन सवसानी आणि कुशाग्र ओझा.
पाकिस्तान U19 संघ:
उस्मान खान, जहांगीर बिलाल, अब्दुल कादिर, अहमद हुसैन, अली रजा, हमजा जहूर (यष्टीरक्षक), हसनैन अब्बास डार, मोहम्मद सय्याम, फरहान युसूफ (कर्णधार), नकाब शफीक, रिजवानुल्लाह, हुजैफा अहसान, अब्दुल सुभान, मोहम्मद हुजैफा आणि हयाम खान.
Source: TV9 Marathi Sports
