
चित्तथरारक, रोमहर्षक, रोमांचक हे शब्दही भारत-पाकिस्तान अंडर 19 फायनलचं वर्णन करायला कमी पडतील. ओमान मध्ये आज भारत-पाकिस्तान संघात अंडर 19 आशिया कप टुर्नामेंटची फायनल झाली. अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात भारताच्या मुलांनी अक्षरश: शेवटच्या चेंडूवर विजय खेचून आणला. शेवटच्या षटकात भारतासमोर विजयासाठी 8 धावांची गरज होती. शेवटी सामना 1 चेंडू 3 धावा असा झाला. स्ट्राइकवर मोहित उलवा आणि चिगुरपती वेंकटा ही जोडी होती. अहमद हुसैन या पाकिस्तानी स्पिनरच्या हाती चेंडू होता. स्ट्राइकवर मोहित उलवा होता. त्याने हुसैनच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारुन अशक्यप्राय वाटणारा विजय शक्य करुन दिला. पाकिस्तानने भारतासमोर 338 धावांचं अवघड लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या मुलांनी हे टार्गेट पार करुन आशिया कप जिंकण्याचं पाकिस्तानचं स्वप्न धुळीस मिळवलं. या विजयासह साखळी गटातील पहिल्या पराभवाचा बदला सुद्धा पूर्ण केला.
338 एवढं अवघड लक्ष्य समोर असताना कॅप्टन लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी टीमला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. आर्यवीरच्या हाताला पाचव्या ओव्हरमध्ये बॉल लागला. दुखापतीत वेदनेने विव्हळत असतानाही त्याने आर्यवीरने टीमसाठी 61 चेंडूत 58 धावा केल्या. त्याने नऊ चौकार मारले. आर्यवीरच्या रुपाने टीमचा पहिला विकेट गेला. लक्ष्य रायचंदानीने दुसरी बाजू लावून धरलेली. त्याने 101 चेंडूत 80 धावा केल्या. द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड 19 धावांवर रनआऊट झाला. मनाल चौहानने 32 चेंडूत 47 धावा फटकावल्या.
मोहित उलवाचा जिगरबाज खेळ
भारताची 9 वी विकेट 309 धावांवर गेली. त्यावेळी भारत विजयापासून 29 धावा दूर होता. 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहित उलवाने जिगरबाज खेळ दाखवला. त्याने हार मानली नाही. 26 चेंडूत नाबाद 49 धावांची खेळी केली. त्याने पाच फोर, तीन सिक्स मारले. त्यामुळे टीम इंडियाचं आशिया कप जिंकण्याचं स्वप्न साकार झालं. चिगुरपती वेंकटाने 8 चेंडूत 11 धावा करुन चांगली साथ दिली. त्याने दोन चौकार मारले. त्यामुळे विजयाचं स्वप्न साकार झालं.
पाकिस्तानच्या उस्मान खानचं शतक
19 वर्षांखालील आशिया कप 2026 चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. भारताला नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकण्यासाठी 338 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. ओमानमधील अल अमिरात येथील मिनिस्ट्री टर्फ-2 मैदानावर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 9 गडी गमावून 337 धावा केल्या होत्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानकडून सलामीवीर उस्मान खानने 107 धावांचे शतक झळकावले. त्याने आपल्या 11 चेंडूंच्या खेळीत 11 चौकार आणि तीन षटकार मारले.
Take a bow, Mohit Ulva!
The celebrations begin after a victory for the ages
Scorecard
https://t.co/srKsrr1jna
#MensU19AsiaCup https://t.co/jjCB1u8pKQ
— BCCI (@BCCI) November 14, 2026
अब्दुल कादिरची जबरदस्त बॅटिंग
अब्दुल कादिर आणि कर्णधार फरहान युसूफ यांनीही अर्धशतके झळकावली. कादिरने 54 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि आठ षटकारांसह 80 धावांची स्फोटक खेळी केली. फरहानने 60 चेंडूंमध्ये 63 धावा केल्या. फरहानने चार चौकार आणि तीन षटकार मारले.
Source: TV9 Marathi Sports




https://t.co/srKsrr1jna