आजकाल सोन्याचा भाव खूपच घसरताना दिसतोय. त्यामुळे लोक दागिने खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात गर्दी करत आहेत. अशा स्थितीत तुमची फसवणूक होऊ नये. भेसळ असलेले दागिने तुम्हाला दिले जाऊ नयेत यासाठी सोन्याची शुद्धता कशी मोजायची हे समजून घेणे गरजेचे आहे.
24 कॅरेट सोने हे जवळपास 100 टक्के शुद्ध असते. सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी 24 हा पूर्णांक मानला जातो. त्यामुळे 24 कॅरेट सोन्यात इतर धातूंचे मिश्रण अत्यंत कमी असते किंवा नसते.
22 कॅरेट सोन्याच्या 24 भागांपैकी 22 भाग शुद्ध सोने असते, तर उर्वरित 2 भागांमध्ये चांदी, तांबे किंवा झिंक यांसारखे धातू मिसळलेले असतात. त्यामुळे 22 कॅरेट सोन्याची शुद्धता 91.6 टक्के असते. याच कारणामुळे 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 916 हा हॉलमार्क क्रमांक असतो.
18 कॅरेट सोन्यात 24 पैकी 18 भाग सोने आणि उर्वरित 6 भाग इतर धातू असतात. त्यामुळे यामध्ये 75 टक्के सोने असते. 18 कॅरेट सोन्याचा हॉलमार्क क्रमांक 750 असतो. इतर धातूंच्या मिश्रणामुळे हे सोने अधिक मजबूत बनते.
हिऱ्यांचे किंवा इतर मौल्यवान खड्यांचे दागिने तयार करताना दागिन्यांना मजबुती येणे आवश्यक असते. त्यामुळे अशा दागिन्यांमध्ये 18 कॅरेट सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. इतर धातूंचे प्रमाण अधिक असल्याने हे सोने 22 कॅरेटच्या तुलनेत अधिक टिकाऊ असते.
सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावरील हॉलमार्क क्रमांक तपासणे महत्त्वाचे आहे. 916 म्हणजे 91.6 टक्के शुद्धता असलेले 22 कॅरेट सोने, तर 750 म्हणजे 75 टक्के शुद्धता असलेले 18 कॅरेट सोने. त्यामुळे दागिन्यांची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क क्रमांक उपयोगी ठरतो.
Source: TV9 Marathi Business






