Hashtagintro

Mumbai Book Festival 2026 : मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; प्रवेश विनामूल्य

मुंबई : मुंबईकरांसाठी पुस्तकप्रेमाचा अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत (NBT-India) यांच्या वतीने 24 ते 29 नोव्हेंबर 2026 या कालावधीत मुंबई पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात, प्रवेशद्वार क्रमांक 2 जवळ हा महोत्सव पार पडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवासाठी नागरिकांना विनामूल्य प्रवेश असेल.

200 प्रकाशक आणि 600 हून अधिक पुस्तकांचे स्टॉल
महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 200 हून अधिक प्रकाशक सहभागी होणार असून, 600 हून अधिक स्टॉलवर विविध भाषांमधील आणि साहित्यप्रकारांतील पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध असतील.
महोत्सवादरम्यान 100 हून अधिक कार्यक्रम आणि सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लेखकांशी संवाद, साहित्यिक चर्चा, पुस्तक प्रकाशन सोहळे, तसेच वंदे मातरम् आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित संकल्पनाधारित प्रदर्शने असतील. मुलांसाठीही विविध शैक्षणिक आणि मनोरंजक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचा लाइव्ह कॉन्सर्ट
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, 24 नोव्हेंबर रोजी मुलांसाठी कथाकथन, चित्रकला स्पर्धा, परिचय सत्र आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजल्यापासून गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचा लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे.

वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश
सर्व वयोगटांतील नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, विविध भाषांमधील साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. मुंबईत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित होणारा हा पुस्तक महोत्सव साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.
महोत्सवाचे वेळापत्रक आणि अन्य माहितीसाठी नागरिकांना www.mumbaibookfestival.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language