Hashtagintro

Legal Rights for Bees | मधमाश्यांना मिळाले चक्क कायदेशीर हक्क

लिमा (पेरू) : निसर्ग संवर्धनाच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले असून, पेरू या दक्षिण अमेरिकन देशाने ‘डंखविरहित मधमाश्यांना’ कायदेशीर अधिकार बहाल केले आहेत. जगातील कोणत्याही कीटकाला अशा प्रकारे कायदेशीर संरक्षण आणि हक्क मिळण्याची ही पहिलीच ऐतिहासिक वेळ आहे.

जगभरात डंखविरहित मधमाश्यांच्या ६०० हून अधिक प्रजाती आढळतात, त्यापैकी १७५ पेक्षा जास्त प्रजाती एकट्या पेरूमध्ये आहेत. केवळ ५ मिलिमीटर लांबीच्या या मधमाश्या स्वसंरक्षणासाठी डंख मारू शकत नाहीत. जंगलतोड, कीटकनाशकांचा अतिवापर आणि हवामान बदलामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले होते. हे संकट ओळखून रसायनशास्त्रज्ञ आणि ‘अ‍ॅमेझॉन रिसर्च इंटरनॅशनल’च्या संस्थापक डॉ. रोजा वास्क्वेझ एस्पिनोझा यांनी ‘अर्थ लॉ सेंटर’ आणि स्थानिक अशानिंका आदिवासी समूहांच्या मदतीने या मधमाश्यांच्या हक्कांसाठी चळवळ उभारली. त्यांच्या या क्रांतिकारी कार्याबद्दल त्यांना २०२६ चा प्रतिष्ठित ‘रोलेक्स पुरस्कार’ देखील जाहीर झाला आहे.

आदिवासी संस्कृती आणि विज्ञानाचा संगम

ऑक्टोबर २०२५ मध्ये सातिपो आणि जानेवारी २०२६ मध्ये नौता या प्रांतांच्या स्थानिक नगरपालिकांनी ‘अ‍ॅमेझोनियन डंखविरहित मधमाश्यांच्या हक्कांचा जाहीरनामा’ मंजूर केला. या कायद्यानुसार, या मधमाश्यांना प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा आणि नैसर्गिक अधिवासात वाढण्याचा हक्क मिळाला आहे. विशेष म्हणजे, जर कोणी या मधमाश्यांचे घरटे असलेले झाड तोडले किंवा त्यांना इजा पोहोचवली, तर पर्यावरणवादी संस्था आणि आदिवासी नेते थेट पेरूच्या न्यायालयात दाद मागू शकतील. या मधमाश्या स्वतःसाठी कोर्टात लढू शकत नाहीत, पण आपण त्यांचा आवाज बनू शकतो, असे डॉ. एस्पिनोझा यांनी म्हटले आहे.

निसर्गाच्या हक्कांची जागतिक चळवळ

यापूर्वी २०२२ मध्ये स्पेनमधील ‘मार मेनोर’ सरोवराला आणि २०२४ मध्ये पेरूतील ‘माराणॉन’ नदीला कायदेशीर व्यक्तीचा दर्जा देण्यात आला होता. त्याच धर्तीवर मधमाश्यांसाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. स्थानिक अशानिंका आदिवासी बांधव पिढ्यान्‌पिढ्या या मधमाश्यांचे रक्षण करत आले असून, त्यांच्या मधाचा वापर पारंपरिक औषधांमध्ये करतात. आता सरकार आणि स्थानिक प्रशासन मिळून शाळांच्या अभ्यासक्रमात या मधमाश्यांचे महत्त्व समाविष्ट करत आहेत, तसेच मधमाशी पालनातून आदिवासींना रोजगार मिळावा यासाठी स्थानिक बाजारपेठाही उभारत आहेत. या यशानंतर पेरूतील पिचारी आणि युनियन अशानिंका या नगरपालिकांनीही हा कायदा लागू केला असून, जगातील १४ देशांनी या उपक्रमाचे अनुकरण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language