राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मध्ये अंतर्गत कलहाची चर्चा सध्या जोर धरत आहे. आमदार रोहित पवारांनी शेतकऱ्यांसाठी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चावरून पक्षातील वरिष्ठ नेते नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेषतः खासदार सुप्रिया सुळे या मोर्चाबाबत विश्वासात न घेतल्याने संतप्त असल्याची चर्चा आहे. सूत्रांनुसार, रोहित पवारांनी मोर्चाची घोषणा करण्यापूर्वी आणि नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबतही वरिष्ठांना माहिती दिली नव्हती.
नागपूरमधील पत्रकार परिषदेच्या बॅनरवर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो नसल्यानेही नाराजीचा सूर उमटत आहे. या कथित नाराजीमुळे सुप्रिया सुळे यांनी सलील देशमुख यांना फोन केल्याचेही बोलले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, २६ तारखेला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) च्या जिल्हाध्यक्षांची मुंबईत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत रोहित पवारांच्या मोर्चाबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहित पवारांच्या डी-लिमिटेशन विधेयकाला विरोध आणि सुप्रिया सुळे यांचा त्याला पाठिंबा, यामुळेही पक्षातील मतभेद समोर येत आहेत.
Source: TV9 Marathi National