Hashtagintro

Mohan Bhagwat : द्वेष बाळगणाऱ्या शेजाऱ्यांनाही भारत मदत करतो : सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान

Mohan Bhagwat on Viksit Bharat : “भारत सर्वांना मदत करण्यास इच्छुक आहे; अगदी जे भारताविरोधात द्वेष बाळगतात, त्यांनाही भारत मदत करतो. जगातील कोणतीही शक्ती भारताची प्रगती पाहू इच्छित नाही, कारण त्यांना केवळ स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. ते ‘सर्वात सक्षम व्यक्तीच टिकून राहते’ या तत्त्वावर विश्वास ठेवतात आणि इतरांना दबावाखाली ठेवू इच्छितात,” असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजीनगर येथे ‘ज्ञानयज्ञ फाउंडेशन’ संस्थेद्वारे आयोजित पाचव्या ‘पद्म महोत्सवा’च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (CDS) जनरल अनिल चौहान (निवृत्त) हे देखील उपस्थित होते.

जगातील कोणतीही शक्ती भारताची प्रगती पाहू इच्छित नाही

भागवत म्हणाले, “जगातील कोणतीही शक्ती भारताची प्रगती पाहू इच्छित नाही, कारण त्यांना केवळ स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. ते ‘सर्वात सक्षम व्यक्तीच टिकून राहते’ या तत्त्वावर विश्वास ठेवतात; त्यांना सर्वांना दबावाखाली ठेवायचे आहे. भारताची प्रगती झाली, तर त्यांचे ‘धंदे’ बंद पडतील, कारण भारताचा उद्देश सर्वांना मदत करण्याचा आहे. भारत अशा शेजारी देशांनाही मदत करतो, जे त्याच्याबद्दल द्वेष बाळगतात.”

तरुण पिढी वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त

“आजची तरुण पिढी वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त आहे. जर कोणी सत्य बोलत असेल, तर तरुण पिढी त्यांच्या पाठीशी उभी राहण्यास तयार असते. त्यांना खोटेपणा आवडत नाही आणि त्यांना आपला देश महान बनवायचा आहे,” असेही भागवत म्हणाले.

‘विकसित भारत’ घडविण्यासाठी तरुण पिढीचे मोठे योगदान : माजी सीडीएस जनरल अनिल चौहान

माजी सीडीएस (CDS) जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांनी नमूद केले की, देशातील तरुण पिढी ही ‘विकसित भारत’ घडवण्यात सर्वात मोठे योगदान देणारी असेल आणि त्याच वेळी या विकासाचा सर्वाधिक लाभही त्यांनाच मिळेल. ते म्हणाले, “जर आपल्याला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’चे उद्दिष्ट गाठायचे असेल, तर त्यात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल आणि तेच याचे मुख्य लाभार्थीही असतील. हे स्वप्न पूर्ण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आपण आपल्या भूतकाळातील यशातून शिकले पाहिजे आणि आपल्या बौद्धिक ऊर्जेचा प्रभावी वापर केला पाहिजे.”

जग एका संवेदनशील टप्प्यातून जात आहे

जनरल चौहान म्हणाले, “विकसित देश एखाद्या राष्ट्राच्या विकासप्रवासात अडथळे निर्माण करू शकतात. सध्याच्या जागतिक सुरक्षा परिस्थितीकडे पाहिल्यास असे दिसते की, जग एका संवेदनशील टप्प्यातून जात आहे, जिथे सर्वत्र अस्थिरता आहे. जागतिक सत्तेचे संतुलन बदलत आहे. कोणताही विकसित देश असे कदापि इच्छिणार नाही की भारत एक यशस्वी, विकसित आणि प्रभावशाली शक्ती म्हणून समोर यावा; त्यामुळे असे देश आपल्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. बाह्य धोक्यांपेक्षा अंतर्गत धोके अनेकदा अधिक घातक असतात,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language