
आयपीएल 2027 च्या लिलावापूर्वी अनेक मोठ्या परदेशी खेळाडूंनी आपली नावं नोंदवली आहेत. एकेकाळी आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने आयपीएल गाजवणाऱ्या या खेळाडूंना यंदा मात्र खरेदीदार मिळणं कठीण दिसत आहे. कारण गेल्या काही काळातील त्यांची कामगिरी, खराब फॉर्म आणि फिटनेसचे प्रश्न यामुळे फ्रँचायझी त्यांच्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यास तयार होतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या यादीत पाच मोठ्या परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. डेव्हिड वॉर्नरपासून वनिंदू हसरंगापर्यंत कोणत्या खेळाडूंना यंदा लिलावात रिकाम्या हाताने परतावं लागू शकतं, जाणून घेऊया.
डेव्हिड वॉर्नर
या यादीतील पहिलं आणि सर्वात मोठं नाव म्हणजे ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर. त्याने आयपीएल 2027 च्या लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं असून त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये आहे. एकेकाळी आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या वॉर्नरला आता मात्र जुन्या फॉर्ममध्ये खेळता येत नाहीये. पाकिस्तान सुपर लीग आणि ILT20 सारख्या स्पर्धांमध्येही त्याला सातत्याने धावा करता आलेल्या नाहीत. त्यामुळे फ्रँचायझी त्याच्यावर मोठी बोली लावण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे.
जॉनी बेअरस्टो
इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जॉनी बेअरस्टो हे दुसरं मोठं नाव आहे. एकेकाळी कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. मात्र, सध्याच्या क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंचा वाढता प्रभाव पाहता बेअरस्टोसाठी स्पर्धा कठीण झाली आहे. त्याचा फॉर्म आणि वय पाहता आयपीएल फ्रँचायझी त्याच्यावर विश्वास दाखवतील का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
डेव्हॉन कॉनवे
न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे यानेही लिलावासाठी नाव नोंदवलं आहे. कॉनवे हा चांगला फलंदाज मानला जातो. मात्र, अलीकडच्या काळातील त्याच्या कामगिरीमुळे त्याला लिलावात मोठी मागणी मिळेल, असे संकेत दिसत नाहीत.
रचिन रवींद्र
न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र याचं नावही या यादीत आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली क्षमता दाखवली आहे. मात्र, अलीकडच्या काळात त्याला अपेक्षित सातत्य राखता आलेलं नाही. त्यामुळे फ्रँचायझी त्याच्यावर किती बोली लावतील, याबाबत उत्सुकता आहे. खराब फॉर्मचा फटका त्याला लिलावात बसू शकतो.
वनिंदू हसरंगा
गोलंदाजीतील विविधतेमुळे हसरंगा टी-20 क्रिकेटमधील महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. मात्र, त्याच्या फिटनेस आणि दुखापतींच्या समस्यांमुळे संघांना त्याच्याबाबत विचार करावा लागू शकतो.
त्यामुळे एकेकाळी आपल्या खेळाने आयपीएल गाजवणाऱ्या आणि कोट्यवधी कमावणाऱ्या या खेळाडूंना यंदा खरेदीदार मिळणार की त्यांना लिलावातून रिकाम्या हाताने परतावं लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Source: TV9 Marathi Sports
