
काहीतरी भलतंच लपवून सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करताना अनेकदा तस्करांची धावपळ होते किंवा त्यांच्या देहबोलीतूनच काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं. असाच एक अजब पण तितकाच धक्कादायक प्रकार चीनमधील शेनझेनच्या फुतियान सीमा तपासणी केंद्रावर समोर आला आहे. हाँगकाँगहून चीनमध्ये प्रवेश करणाऱ्या एका महिलेच्या चालण्याच्या विचित्र पद्धतीमुळे अधिकाऱ्यांचा संशय बळावला आणि तपासणीअंती तिच्या पायांना बांधलेले तब्बल 21 जिवंत साप सापडले.
नेमकं घडलं तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला हाँगकाँगमधून सीमा पार करून चीनमध्ये येत होती. तपासणी केंद्रावरून जाताना तिची चालण्याची पद्धत नेहमीसारखी नव्हती. ती पाय ताठ ठेवून, जरा अवघडल्यासारखी चालत होती. तिची हीच चाल अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. संशयाच्या आधारे तिला तात्काळ थांबवून तिची कसून तपासणी करण्यात आली.
नी-पॅड अन् मोज्यांत साप
अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, महिलेच्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांवर काळ्या रंगाचे नी-पॅड बांधल्याचं दिसून आलं. हे नी-पॅड पारदर्शक चिकटपट्टीने (टेप) घट्ट गुंडाळण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी हे नी-पॅड काढून पाहिल्यावर धक्काच बसला. त्याखाली काळ्या मोज्यांमध्ये गुंडाळलेली लहान पाकिटं लपवलेली होती. ही पाकिटं उघडताच आत जिवंत साप वळवळताना दिसले.
दोन्ही पायांवर अशाच प्रकारे साप लपवण्यात आले होते. सर्व सापांची मोजणी केल्यानंतर तब्बल 21 जिवंत साप सापडल्याचं स्पष्ट झालं. हे पाहून तपासणी अधिकाऱ्यांचीही भंबेरी उडाली.
विदेशी प्रजातीचे साप; तस्करी फसली
जप्त करण्यात आलेल्या सापांची पुढे तपासणी करण्यात आली. त्यावेळी हे साप विदेशी प्रजातीचे असल्याचं समोर आलं आहे. चीनमध्ये परवानगीशिवाय विदेशी प्राणी किंवा साप आणण्यास सक्त मनाई आहे. मात्र, या नियमांना धाब्यावर बसवत महिलेने चोरट्या मार्गाने हे साप आणण्याचा प्रयत्न केला होता.
पायांवर साप बांधल्यामुळे तिला सहज आणि नीट चालता येत नव्हतं. पाय ताठ ठेवून चालण्याची तिची हीच मजबूरी अखेर तिचं बिंग फोडण्यास कारणीभूत ठरली. सीमा तपासणी अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व 21 साप ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
Source: TV9 Marathi International
