Hashtagintro

अफजल गुरू माझ्यासमोरच, सर्व वाईट गोष्टी एकत्रच..; प्रमोद महाजन यांच्या मुलाचा खुलासा

अफजल गुरू माझ्यासमोरच, सर्व वाईट गोष्टी एकत्रच..; प्रमोद महाजन यांच्या मुलाचा खुलासा

Rahul Mahajan: टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शोमधून लोकप्रिय झालेला राहुल महाजन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. पडद्यावर हसताना आणि विनोद करताना दिसणाऱ्या राहुलने खऱ्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आहे. वडील प्रमोद महाजन यांचं निधन, वैवाहिक आयुष्यातील अपयश आणि तिहार तुरुंगातील दिवस अशा अनेक घटनांनी त्याचं आयुष्य ढवळून निघालं. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये राहुलने त्याच्या आयुष्यातील त्या कठीण काळाच्या आठवणी सांगितल्या. अवघ्या एका वर्षात आयुष्यात इतक्या मोठ्या घटना घडल्या की, मी पूर्णपणे खचून गेलो होतो, असं त्याने सांगितलं.

वडिलांच्या निधनानंतर महिन्याभरातच तिहार तुरुंगात

राहुल महाजन हा दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा आहे. वडिलांच्या निधनाचा मोठा धक्का राहुलला बसला होता. त्यावेळी त्याला वाटलं होतं की, आयुष्यात यापेक्षा वाईट काहीच घडू शकत नाही. मात्र, वडिलांच्या निधनानंतर अवघ्या महिन्याभरातच त्याला तिहार तुरुंगात जावं लागलं. ड्रग्सच्या ओव्हरडोजशी संबंधित प्रकरणामुळे त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता. सुभोजित घोष यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना राहुलने सांगितलं की, आयुष्य आपल्याला किती कठीण परिस्थितीत टाकू शकतं, याची जाणीव त्याला या घटनांमधून झाली. वडिलांचं निधन, लग्न आणि घटस्फोट, त्यानंतर तुरुंगातील दिवस, अशा अनेक गोष्टी अवघ्या 356 दिवसांत घडल्या. या काळाने त्याला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे हादरवून टाकलं होतं.

‘अफझल गुरू माझ्यापासून 100 मीटर अंतरावर होता’

तिहार तुरुंगातील दिवस आठवताना राहुलने एक धक्कादायक अनुभव सांगितला. तुरुंगात असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिथे पंखाही नव्हता, मात्र त्या परिस्थितीतही त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. तुरुंगात दहशतवादी अफझल गुरू त्याच्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर होता, असं राहुलने सांगितलं. या अनुभवातून आयुष्यातील वाईट काळाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला. आपण एखाद्या परिस्थितीला आयुष्यातील सर्वांत वाईट टप्पा समजत असतो; मात्र त्यापेक्षाही कठीण परिस्थिती समोर येऊ शकते, असं त्याला जाणवलं.

राहुल महाजनच्या वैयक्तिक आयुष्याचीही कायम चर्चा होत असते. त्याने आयुष्यात तीन लग्नं केली, मात्र तिन्ही नात्यांचा शेवट घटस्फोटात झाला. त्याचं पहिलं लग्न श्वेता सिंह यांच्याशी, दुसरं लग्न डिंपी गांगुली यांच्याशी, तर तिसरं लग्न नतालिया इलीना यांच्याशी झालं होतं. मात्र, कोणतंच नातं टिकू शकलं नाही. आयुष्यात अनेक संकटांचा सामना केल्यानंतर राहुल आता स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अध्यात्माकडे त्याचा कल वाढला असून, इतर लोक काय बोलतात याचा स्वतःवर फारसा परिणाम होऊ देत नसल्याचं त्याने सांगितलं. कठीण काळातही मी स्वतःला इजा केली नाही किंवा टोकाचं पाऊल उचललं नाही, ही बाबही त्याने आवर्जून सांगितली.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language