साल 1978 मध्ये अमिताभ बच्चन यांचा 'डॉन' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील डायलॉग, कथा सगळंच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.
डॉन चित्रपटातील 'खाइके पान बनारसवाला' हे गाणं आजही अनेकांचं आवडतं असून ऐकताना लोकं गुणगुणतात. मात्र हे गाणं डॉन चित्रपटासाठी बनवलं नसून 'बनारसी बाबू' या चित्रपटासाठी होतं.
बनारसी बाबूमधील नायकाने हे गाणं रिजेक्ट केलं, ज्यामुळे डॉन चित्रपटातील रिक्त जागेवर हे गाणं घेण्यात आलं आणि या कलाकृतीने कमालच केली.
या गाण्याचा किस्सा इतक्यावरच थांबत नाही. हे गाणं गायक किशोर कुमार यांनादेखील पसंत पडलं नव्हतं. अनेक अटीतटींनंतर त्यांनी गाण्यास होकार दिला. यापैकी त्यांची एक रंजक अट होती.
किशोर कुमार म्हणाले, “हे गाणं मी एका टेकमध्येच गाणार. चांगलं झालं तर झालं, नाही तर नाही…” अखेर गाणं एका टेकमध्येच छान बनलं. महत्त्वाचं म्हणजे किशोर कुमार यांनी हे गाणं गाण्यासाठी खराखुरा पान मागवला आणि स्टुडिओमध्ये खाऊन थुकले.
Source: TV9 Marathi Entertainment





