Hashtagintro

अशोक सराफ यांच्यासोबत जमलेली गट्टी; शूटिंगसाठी निघाली, एक अपघात अन् दोन्ही पाय निकामी, मराठी अभिनेत्रीची हृदयद्रावक कहाणी

अशोक सराफ यांच्यासोबत जमलेली गट्टी; शूटिंगसाठी निघाली, एक अपघात अन् दोन्ही पाय निकामी, मराठी अभिनेत्रीची हृदयद्रावक कहाणी

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख. आपल्या सहजसुंदर अभिनयानं आणि विनोदी भूमिकांनी त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, यशाच्या शिखरावर असताना घडलेल्या एका भीषण अपघातानं त्यांच्या आयुष्याला अनपेक्षित वळण दिलं. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक चर्चा झाल्या होत्या. त्यात अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतच्या नात्याची चर्चा विशेष गाजली.

अभिनयाच्या जोरावर मिळवली लोकप्रियता

रंजना देशमुख या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या कन्या होत्या. अभिनयाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं होतं. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी ‘हरिश्चंद्र तारामती’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘असला नवरा नको गं बाई’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘गुपचुप गुपचुप’, ‘बहुरूपी’, ‘बिनकामाचा नवरा’ आणि ‘खिचडी’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. गंभीर भूमिकांपासून विनोदी व्यक्तिरेखांपर्यंत प्रत्येक प्रकारच्या भूमिकेत त्या सहज वावरत असत. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि पडद्यावरील उपस्थिती यामुळे त्या प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्री बनल्या.

अशोक सराफ यांच्यासोबतची जोडी गाजली

रंजना देशमुख आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. विशेषतः ‘बिनकामाचा नवरा’ या चित्रपटातील त्यांची जोडी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. वैयक्तिक आयुष्यातही अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांच्या अफेअरच्या चर्चा झाल्या. ते दोघं लग्न करणार असल्याच्याही चर्चा होत्या. पण, रंजना यांच्या अपघातानंतर त्यांच्या नात्याचा शेवट झाला, असं म्हटलं जातं.

एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी रंजना यांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं होतं. रंजना यांनी सुरुवातीच्या काळात प्रामुख्यानं गंभीर भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यासोबत काम करताना त्यांनी विनोदी भूमिकाही प्रभावीपणे साकारल्या. रंजना यांचा अभिनय इतका प्रभावी होता की, काही प्रसंगी त्या आपल्यापेक्षाही सरस ठरत असल्याचं अशोक सराफ यांनी नमूद केलं होतं. एखादी सहकलाकार आपल्यापेक्षा चांगली कामगिरी करत असेल, तर तिच्या यशाचा आनंद व्हायचा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. ‘तिच्यासारखी दुसरी नटी कोणीच नाही, तिच्यासारखी तीच’, अशा शब्दांत त्यांनी रंजना यांच्या अभिनयातील वेगळेपण अधोरेखित केलं होतं.

१९८७ मधील अपघातानं बदललं संपूर्ण आयुष्य

रंजना यांच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ १९८७ मध्ये आला. ‘झुंजार’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्या बंगळुरूला जात असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातातून त्या बचावल्या, मात्र त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघातात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले, तर डाव्या हाताला देखील जबर मार बसला. ही घटना घडली तेव्हा त्या फक्त 32 वर्षांच्या होत्या. ऐन तारुण्यात त्यांना व्हीलचेअरवर बसण्याची वेळ आली. बेडवर, व्हीलचेअरवर त्यांनी अनेक वर्षे काढली. रंजना यांच्या आयुष्यात आता एकाकीपणा आला होता.

अपघातानंतर रंजना यांचं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही. अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या गुणी अभिनेत्रीला अनेक वर्षं शारीरिक मर्यादांशी झुंज द्यावी लागली. अखेर २००० मध्ये मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीतील एका प्रतिभावान अभिनेत्रीचा प्रवास संपला.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language