Hashtagintro

इथे कुत्र्याला पालखीत बसवून काढतात मिरवणूक! नेमका का साजरा केला जातो हा अनोखा उत्सव?

इथे कुत्र्याला पालखीत बसवून काढतात मिरवणूक! नेमका का साजरा केला जातो हा अनोखा उत्सव?

जगभरात विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. प्रत्येक देशातील सण साजरे करण्याच्या परंपरा आणि पद्धती वेगवेगळ्या असतात. मात्र, तुम्ही कधी असा उत्सव ऐकला आहे का, ज्यामध्ये कुत्र्याला पारंपरिक कपडे आणि दागिने घालून पालखीत बसवलं जातं आणि संपूर्ण गावातून त्याची मिरवणूक काढली जाते? ऐकायला विचित्र वाटत असलं तरी चीनमध्ये दरवर्षी असा अनोखा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात कुत्र्याला विशेष सन्मान दिला जातो. यामागे अनेक वर्षांपासून चालत आलेली एक खास परंपरा आणि श्रद्धा आहे.

कुठे साजरा केला जातो हा अनोखा उत्सव?

चीनच्या नैऋत्य भागातील गुइझोऊ प्रांतातील जियाओबांग गावात हा उत्सव साजरा केला जातो. या गावात मियाओ समुदायाचे लोक राहतात. ते कुत्र्याला आपला रक्षक आणि जीव वाचवणारा साथीदार मानतात. त्यामुळे कुत्र्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ‘डॉग कॅरिंग फेस्टिव्हल’ साजरा केला जातो. स्थानिक भाषेत या उत्सवाला ‘ताई गोउ जी’ असं म्हणतात.

कुत्र्याला सजवून पालखीतून काढतात मिरवणूक

या उत्सवासाठी गावकरी एका कुत्र्याची निवड करतात. निवडलेल्या कुत्र्याला मियाओ समुदायाचे पारंपरिक कपडे घातले जातात. त्याच्या डोक्यावर वाघाच्या चेहऱ्यासारखी खास टोपी आणि गळ्यात चांदीचा दागिना घातला जातो. त्यानंतर कुत्र्याला बांबूपासून तयार केलेल्या पालखीत बसवून संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत गावकरी ढोल वाजवतात, नृत्य करतात आणि एकमेकांवर चिखलही उडवतात. या परंपरेमुळे गावात सुख-समृद्धी नांदते, चांगला पाऊस पडतो आणि भरघोस पीक येतं, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.

काय आहे या उत्सवामागे कारण?

या अनोख्या उत्सवामागे दोन प्राचीन कथा सांगितल्या जातात. पहिल्या कथेनुसार, एकदा गावात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी एका वृद्ध व्यक्तीला स्वप्नात देवाने दर्शन दिलं. कुत्र्यासोबत प्रार्थना केल्यास पाऊस पडेल, असं देवाने सांगितल्याची मान्यता आहे. गावकऱ्यांनी त्याप्रमाणे प्रार्थना केली आणि त्यानंतर पाऊस पडल्याचं सांगितलं जातं.

दुसऱ्या कथेनुसार, प्राचीन काळात एका कुत्र्याने गावकऱ्यांना पाण्याचा लपलेला स्रोत शोधून दिला होता. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले होते. या घटनेमुळे गावकरी कुत्र्याला आपला रक्षक मानू लागले. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.

नव्या पिढीसाठी आहे खास परंपरा

या उत्सवात आणखी एक अनोखी परंपरा पाहायला मिळते. अविवाहित तरुणी आपल्या पाठीवर कुत्र्याची पिल्लं घेऊन गावातील घरांमधून तांदूळ गोळा करतात. याला ‘शंभर कुटुंबांचा तांदूळ’ असं म्हटलं जातं. त्यानंतर गावातील एक सन्माननीय वृद्ध व्यक्ती हे अन्न लहान मुलांना वाटते. या विधीमुळे मुलांचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्यांची वाढ उत्तम होते, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.

Source: TV9 Marathi Lifestyle

Read full article on TV9 Marathi Lifestyle

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language