Hashtagintro

चेहऱ्यावरील सुरकुत्या अन् फाइन लाइन्सची चिंता सोडा, घरीच लिंबू-जवसापासून बनवा कोलेजन जेल, मिळेल नॅचरल ग्लो

चेहऱ्यावरील सुरकुत्या अन् फाइन लाइन्सची चिंता सोडा, घरीच लिंबू-जवसापासून बनवा कोलेजन जेल, मिळेल नॅचरल ग्लो

वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या, फाइन लाइन्स आणि त्वचा सैल पडण्यासारख्या समस्या दिसू लागतात. याशिवाय बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे चेहरा निस्तेज दिसतो. त्वचेवरील या समस्या कमी करण्यासाठी अनेक जण बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम आणि सीरमचा वापर करतात. मात्र, प्रत्येक वेळी या उत्पादनांवर जास्त पैसे खर्च करणे शक्य नसते. अशा वेळी घरातील काही पदार्थांचा वापर करून त्वचेसाठी नैसर्गिक जेल तयार करता येऊ शकते. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला जवसाच्या बिया, लिंबू आणि कोरफडीचे जेल यांसारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांची गरज आहे. जवसापासून तयार केलेले जेल त्वचेला ओलावा देण्यास मदत करू शकते. जाणून घेऊया हे जेल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि सोपी पद्धत.

जेल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

• जवसाच्या बिया – ३ ते ४ मोठे चमचे

• पाणी – एक ते दीड कप

• ताज्या लिंबाचा रस – १ लहान चमचा

• एलोवेरा जेल – १ मोठा चमचा

• व्हिटॅमिन ई कॅप्सूल – १ (ऐच्छिक)

• बदामाचे तेल किंवा ग्लिसरीन – अर्धा लहान चमचा

घरच्या घरी जेल तयार करण्याची पद्धत

घरी कोलेजन जेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दीड कप पाणी घ्या. त्यामध्ये ३ ते ४ चमचे जवसाच्या बिया घालून मध्यम आचेवर ७ ते १० मिनिटे उकळा. पाणी घट्ट होऊन जेलसारखे दिसू लागल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर मिश्रण गरम असतानाच स्वच्छ सुती कापड किंवा गाळणीच्या मदतीने गाळून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये ताज्या लिंबाचे रस, कोरफडीचे जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल आणि थोडे ग्लिसरीन किंवा बदामाचे तेल मिक्स करा. आता सर्व साहित्य चमच्याच्या मदतीने व्यवस्थित एकत्र करा. मिश्रण मऊ आणि क्रीमसारखे होईपर्यंत ढवळा. अशा प्रकारे घरच्या घरी जवसाचे नैसर्गिक जेल तयार होईल.

चेहऱ्यावर जेल कसे लावावे?

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा फेस वॉशने स्वच्छ धुवून कोरडा करा. त्यानंतर तयार केलेले जेल थोड्या प्रमाणात चेहरा आणि मानेवर लावा. हलक्या हाताने सर्कुलर मोशनमध्ये साधारण २ मिनिटे मसाज करा. हे रात्रभर चेहऱ्यावर लावून तसेच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. उत्तम परिणामांसाठी याचा दररोज वापर करा.

Source: TV9 Marathi Lifestyle

Read full article on TV9 Marathi Lifestyle

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language