तेलंगणामध्ये एक संतापजनक आणि खळबळजनक घटना घडली आहे. बापानेच पोटच्या लेकीचा खून केल्याच्या घटनेमुळे आदिलाबाद जिल्हा हादरून गेला आहे. आपल्या लेकीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आणि त्यातून कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीने वडिलांनीच आपल्या लेकीचा जीव घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही हत्या लपवण्यासाठी त्या मुलीच्या वडिलांनी आधी तिला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न केला आणि नंतर नातेवाईकांचीही वाट न पाहता पहाटेच अंत्यविधी उरकून पुरावे मिटवण्याचा डाव रचला. मात्र, या संशयास्पद घाईगडबडीमुळे गावकऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि वडिलांचं संपूर्ण पितळ अखेर उघड झालं.
https://www.prahaar.in/2026/11/27/who-is-responsible-for-the-deaths-of-the-three-students-driver-in-bopdev-ghat-accident-remanded-to-police-custody/
ही धक्कादायक घटना तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील उमरी गावात घडली आहे. तेलंगाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिलांचे नाव कैलास अडे असे असून मृत मुलीचे नाव कल्याणी अडे असं होतं. कल्याणीचे बाहेर एका युवकासोबत प्रेमसंबंध असल्याची गोष्ट काही दिवसांपूर्वी वडिलांच्या कानावर आली होती. घरच्यांनी कल्याणीचे लग्न आधीच ठरवले होते आणि अवघ्या दोन दिवसांवर तिचा साखरपुडा येऊन ठेपला असताना, वडिलांनी आपल्या पोटच्या लेकीची गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या लेकीचे बाहेर प्रेमसंबंध आहेत, ही गोष्ट समाजामध्ये कळाल्यानंतर आपल्या कुटुंबाची नाचक्की होऊ नये, यासाठी रागाच्या भरामध्ये वडिलांनी मुलीला संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
https://www.prahaar.in/2026/11/26/loc-issued-against-three-cjp-office-bearers-in-connection-with-a-protest-on-gandhi-jayanti/
उटनूर येथील एएसपी रुथविक साई कोट्टे यांनी या प्रकरणाविषयी माध्यमांना अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला आपल्या मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे घराची बदनामी होण्याची भीती वाटत होती. याच रागाच्या भरामध्ये आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. २४ नोव्हेंबरच्या पहाटे आरोपीने कथितरीत्या उशीने कल्याणीचे तोंड आणि नाक दाबले. उशीने जोरात नाक आणि तोंड दाबल्यामुळे तिचा श्वास गुदमरला, त्याच दरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर ही घटना आत्महत्येसारखी वाटावी यासाठी, आरोपीने कल्याणीचा मृतदेह दुपट्ट्याच्या साहाय्याने छताच्या लाकडी तुळईला लटकवला, जेणेकरून गावकऱ्यांना आणि इतरांना तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्यासारखे वाटेल.
https://www.prahaar.in/2026/11/26/rs-25-lakh-fraud-under-the-pretext-of-providing-travel-services-two-arrested-from-lucknow-rs-15-lakh-seized/
हत्येनंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने अत्यंत घाईघाईत पावले उचलली. २४ नोव्हेंबरच्या सकाळीच, नातेवाईक घरी येण्याचीही वाट न पाहता त्यांनी कल्याणीवर अंत्यसंस्कार करून टाकले. एखाद्या तरुणीच्या निधनानंतर इतक्या घाईने आणि कोणालाही न कळवता अंत्यविधी केल्यामुळे गावात कुजबुज सुरू झाली आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले. या संशयास्पद हालचालींची दखल घेत गावातील पंचायत सचिवाने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पंचायत सचिवांची तक्रार मिळताच नरनूर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. प्राथमिक चौकशी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी कैलास अडे विरोधात, भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103 (1) आणि कलम 238 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कलम 103 (1) हत्येसंबंधित असून, कलम 238 गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे किंवा लपवण्याशी संबंधित आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Source: Prahaar News
