अभिनेता इमरान हाश्मी पुन्हा एकदा आपल्या अॅक्शन अवतारामुळे चर्चेत आला आहे. त्याचा 'गनमास्टर जी9' (Gunmaaster G9) हा चित्रपट 27 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती. विशेष म्हणजे, इमरानच्या 'आवारापन 2' या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्याच्या नव्या चित्रपटाकडूनही चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. आता चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले असून, बॉक्स ऑफिसवर त्याने चांगली सुरुवात केली आहे.
इतकंच नाही, तर IMDb वर चित्रपटाला 10 पैकी 9.4 रेटिंग मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. 'गनमास्टर जी9'ने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 3.65 तर दुसऱ्या दिवशी 4.35 कोटींची नेट कमाई केली आहे. दोन दिवसांचं देशांतर्गत नेट कलेक्शन 8 कोटी रुपये झालं आहे. इमरान हाश्मीच्या करिअरमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे.
विशेष म्हणजे, याच दिवशी प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्या यांच्या 'ये प्रेम मोल लिया' या चित्रपटालाही 'गनमास्टर जी9'ने चांगली टक्कर दिली. आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4 कोटी रुपयांची नेट कमाई केली. त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर चुरस पाहायला मिळत आहे.
बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच 'गनमास्टर जी9'च्या IMDb रेटिंगचीही चर्चा होत आहे. या चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 9.4 रेटिंग मिळाली आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी दिवसांत चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात इमरान हाश्मी ईश्वर नावाची भूमिका साकारत आहे. ईश्वर हा पूर्वी गुन्हेगारी जगतात सक्रिय असतो. मात्र, आयुष्यात आलेल्या काही घटनांनंतर तो गुन्हेगारीचा मार्ग सोडून डेअरी फार्म चालवू लागतो. पत्नी आरती आणि मुलगी जियासोबत तो शांत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याच्या भूतकाळामुळे कुटुंबावर संकट ओढवतं आणि त्याला पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या जगात परतावं लागतं.
या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत जेनेलिया देशमुख आणि अपारशक्ती खुराना महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. आदित्य दत्त यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
Source: TV9 Marathi National






