Hashtagintro

दिवाळीनंतर घरात मिठाई उरली आहे? फेकून देण्याऐवजी ‘या’ पद्धतीने करा वापर

दिवाळीनंतर घरात मिठाई उरली आहे? फेकून देण्याऐवजी ‘या’ पद्धतीने करा वापर

दिवाळीनिमित्त घरोघरी विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ बनवले जातात. याशिवाय बाजारातूनही वेगवेगळ्या प्रकारची मिठाई आणली जाते. अनेक जण नातेवाईक आणि मित्रमंडळींना मिठाई भेट म्हणून देतात. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतरही घरात बरीच मिठाई शिल्लक राहते. फ्रिजमध्ये ठेवलेली ही मिठाई पुन्हा खाण्याचा कंटाळा येतो आणि ती संपवायची कशी, असा प्रश्नही पडतो. तुमच्याही घरी दिवाळीनंतर मिठाई उरली असेल, तर ती फेकून देण्याची किंवा संपवण्याची चिंता करू नका. या उरलेल्या मिठाईचा वापर करून तुम्ही काही चविष्ट पदार्थ तयार करू शकता. जाणून घेऊया मिठाईचा नव्या पद्धतीने पुनर्वापर करण्याच्या काही सोप्या आणि भन्नाट कल्पना.

सोनपापडीपासून बनवा पुरणपोळी

दिवाळीत अनेकांना सोनपापडी मिठाई भेट म्हणून मिळते. त्यामुळे अनेक घरांमध्ये सोनपापडीचे बॉक्स तसेच पडून राहतात. तुमच्याही घरी सोनपापडी शिल्लक असेल, तर तिचा वापर करून चविष्ट पुरणपोळी तयार करू शकता. यासाठी सोनपापडीमध्ये थोडे दूध घालून त्याची मऊ पेस्ट तयार करा. या मिश्रणाचा पुरणपोळीच्या सारणाप्रमाणे वापर करून पोळ्या बनवा. नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा ही पोळी वेगळी आणि चवीला गोड लागेल.

उरलेल्या मिठाईपासून तयार करा शेक

फ्रिजमध्ये खव्यापासून बनवलेली मिठाई शिल्लक असेल, तर तिचा वापर करून स्वादिष्ट शेक तयार करता येतो. यासाठी थंड दुधात खव्याची मिठाई घालून मिक्सरमध्ये चांगले फिरवून घ्या. गरजेनुसार त्यात थोडे दूध वाढवा. अशा प्रकारे तयार झालेला क्रीमी आणि गोड शेक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकतो.

बुंदीच्या लाडवांपासून बनवा खीर

दिवाळीत बुंदीचे लाडू जास्त प्रमाणात आले असतील, तर त्यांच्यापासून वेगळ्या चवीची खीर तयार करू शकता. यासाठी एका भांड्यात दूध घेऊन ते थोडे घट्ट होईपर्यंत गरम करा. त्यानंतर त्यात बुंदीचे लाडू कुस्करून घाला आणि मिश्रण चांगले शिजू द्या. लाडूंचा गोडवा दुधात उतरल्यामुळे चविष्ट बुंदीची खीर तयार होईल.

उरलेल्या मिठाईचे बनवा गोड पराठे

घरात कोणत्याही प्रकारची मिठाई उरली असेल, तर तिचा वापर करून गोड पराठे तयार करता येतात. यासाठी मिठाईचा चुरा करून घ्या. त्यानंतर कणकेच्या गोळ्यात हे सारण भरून पराठा लाटून घ्या. तव्यावर तूप किंवा तेल लावून पराठा दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या. हे गोड आणि चविष्ट पराठे लहान मुलांना विशेष आवडू शकतात.

Source: TV9 Marathi Lifestyle

Read full article on TV9 Marathi Lifestyle

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language