Hashtagintro

पहिला चहा | दुसरी खुर्ची शोधा!

(जिल्हा बँक आवारात बँकेच्या दोन संचालकांत झालेला संवाद)

आबासाहेब : बबनराव, काय झालं? असं का चेहरा पाडून बसलायसा… नेत्यांनी फोन उचलणं बंद केलं का काय? की तुमच्या कार्यकर्त्यानं दुसऱ्या गटात चहा प्यायला सुरुवात केली…? हाहाहाहाहा

बबनराव : चहा घ्या आणि गप्प बसा.

आबासाहेबः बँकेला तोटा झाला?

बबनरावः नाही, माझाच झालाय.

आबासाहेबः म्हणजे…

बबनरावः कोर्टाच्या एका निर्णयानं माझ्या राजकीय कारकिर्दीला भूकंपाचा धक्का दिलाय.

आबासाहेबः लई गंभीर आहे काय?

बबनरावः भयंकर आहे… सहकारी बँकेत दहा वर्ष संचालक राहिलेल्यांना पुन्हा संचालक होता येणार नाही, असा निर्णय आलाय

आबासाहेबः हम्म… पण दहा वर्षे म्हणजे काही कमी काळ नाही…

बबनराव: तुम्हाला काय कळणार? तुम्ही संचालकपदाकडे पद म्हणून बघता. आम्ही त्याला परंपरा मानतो. आमच्या घराण्यात लग्नाआधी पत्रिका पाहतात आणि निवडणुकीआधी बँकेचं संचालकपद!

आबासाहेब: म्हणजे तुमच्या घरात बाळ जन्माला आलं की बारशाआधी त्याची बँकेच्या मतदारयादीत नोंद करता की काय?

बबनराव: थट्टा करू नका. माझी सलग तीन टर्म झालीय. बँकेत शिपाई मला पाहून उभा राहतो. आता मी संचालक नसलो, तर तो बसूनच राहील की काय, ही भीती आहे.

आबासाहेब: म्हणजे तुमची गुंतवणूक बँकेत नाही, शिपायाच्या गुडघ्यात आहे!

बबनराव: तुमचं बरं आहे हो… तुमची पहिली टर्म सुरू आहे…

आबासाहेबः बरं मग आता काय…

बबनरावः नेत्यांना भेटलो… म्हणाले, ‘काळजी करू नका, काहीतरी मार्ग काढू.’

आबासाहेबः बबनराव, राजकारणात प्रश्न सुटला नाही की ‘काहीतरी मार्ग काढू’ म्हणतात.

बबनरावः कार्यकता म्हणतोय, दुसऱ्याच्या नावावर संचालक व्हा… हाहाहा..

आबासाहेबः आता पुढे काय…

बबनरावः आमच्या राजकीय पुनवर्सनाची वेळ आली आहे…

आबासाहेबः पुनर्वसन कसलं? तुम्ही काही पूरग्रस्त नाही. १५ वर्षं खुर्चीवर बसलात. आता थोडं जनतेत उभं राहा की!

बबनराव: माझ्या जखमेवर मीठ चोळताय

आबासाहेब: नाही हो. जखम भरून यावी म्हणून मलम लावतोय.

बबनराव: एक सांगा, दहा वर्ष संचालक राहिलेल्यांना पुन्हा संधी नाही, तर चार-चार पाच-पाच टर्म आमदार-खासदारांच काय हो…

आबासाहेब: त्यांच्यावर अजून मर्यादेचा निर्णय आलेला नाही!

बबनराव: चला, आजपासून आम्हीही जनतेत मिसळतो!

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language