Hashtagintro

पहिला चहा : शायनापणा!

बरेच आंदोलक वेगवेगळ्या, अनोख्या आंदोलनांतून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतेच एक आंदोलन म्हणा की निषेधाचा प्रकार म्हणा, तो चर्चेत आला. पुस्तकात आपल्याला आवडत नाही, असा मजकूर असल्याने पुस्तक फाडणे असा हा प्रकार. अहो पण, त्या पुस्तकाची किंमत तर बघा. ए‍वढे महागडे पुस्तक आधी विकत घ्यायचे आणि नंतर ते फाडायचे म्हणजे एका दिवसासाठी बातमीत राहाल, पण किती ही खटपट. किती आर्थिक खर्च. बरं, पुस्तक स्वस्त असेल, तर तेवढ्या खर्चाचे काही वाटणार नाही हो! पण, पुस्तक महाग असले आणि त्याच्या अनेक प्रती आणून फाडायच्या म्हणजे खिशाला चाटच की… बरं, ते करतानाही आपण जे फाडतो आहोत, त्यावरून कुणी काही नाराज होणार नाही ना, याचीही काळजी घ्यावी लागते. ‘नहीं तो लेने के देने पड जाते है…’

शिंदे सेनेच्या नेत्या शायना एनसी यांची गत अशीच झाली. काँग्रेस नेत्या यांचे चर्चेतील आत्मचरित्र त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यातील काही मजकुरावर आक्षेप नोंदवत फाडले. सामूहिकरीत्या हा फाडकाम कार्यक्रम झाला; पण जोश मे होश खो गया… मनिशंकर अय्यर यांचे छायाचित्र फाडायचे असताना चुकून बाळासाहेब ठाकरेंचे छायाचित्र फाडले गेले. शिवसेनेच्या नेत्याकडून असे होणे म्हणजे….

मणिशंकर अय्यर यांना स्वतःचा फोटो फाडल्याचा त्रास झाला नाही; पण फोटो फाडणाऱ्या शायना यांना मात्र त्रास झालाच. कारण, त्यावर ठाकरे गटाकडून दणादण बाण सुटू लागले आणि शिंदे गट करून करून किती डिफेंड करणार. अखेर माफी मागितल्याने या विषयावर पडदा पडला आहे, असे मानायला हरकत नाही. यापुढे पक्षाने फाडाफाडी करण्याचे काम पुरुषांना द्यावे. कारण, असे काम करताना धांदरटपणा करून चालत नाही. यापुढे फाडाफाडी करू नये आणि तरीही करावयाची झाल्यास डोळे उघडे ठेवून करावी. उगाच शहाणपणा (की शायनापणा) दाखवायला जाऊ नये…

या प्रकारानंतर एकच म्हणावेसे वाटते, आंदोलन करताना आवाज किती मोठा आहे यापेक्षा डोळे किती उघडे आहेत, हे महत्त्वाचे! कारण, निषेधाचा फटका विरोधकांना बसण्याऐवजी स्वकीयांनाच बसला, तर आंदोलनापेक्षा माफीच जास्त गाजते. पुस्तक फाडण्याच्या घाईगडबडीत स्वतःचीच प्रतिमा फाटण्याची शक्यता असते. पुढच्या वेळी निषेधासाठी पुस्तक हातात घेण्याआधी त्यातला मजकूर आणि मुखपृष्ठावरचा फोटो, दोन्ही नीट तपासावेत. नाहीतर आंदोलनाचा हेतू बाजूला राहील आणि फाडलेली पाने जोडण्याची वेळ मात्र आपल्यावरच येईल!

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language