
इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आहे. प्रत्येक क्रिकेटपटूचे त्यात खेळण्याचे स्वप्न असते. या लीगचा 20 वा हंगाम पुढील वर्षी खेळला जाईल. त्यासाठी पुढच्या महिन्यात गोव्यात लिलाव होणार आहे. लिलावासाठी उपलब्ध होणाऱ्या खेळाडूंची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र यावेळी यात अशा नावांपैकी एक नाव पाकिस्तानी क्रिकेटपटूचे असण्याची शक्यता आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरचे नाव असू शकते. मोहम्मद अमीरने आता ब्रिटिश नागरिकत्व मिळवले आहे. त्याने नुकतेच अफगाणिस्तान प्रीमियर लीगच्या ड्राफ्टमध्ये ब्रिटिश खेळाडू म्हणून नाव नोंदवले आहे. यामुळे आमिरच्या आयपीएलमध्ये खेळण्याच्या शक्यतेबद्दल चर्चा सुरू आहे. यानंतर आता असेही म्हटले जात आहे की, तो आयपीएल लिलावातही आपले नाव नोंदवू शकतो.
अफगाणिस्तान प्रीमियर लीगच्या ड्राफ्टमध्ये अनेक भारतीय खेळाडूंनीही नोंदणी केली आहे. या खेळाडूंमध्ये माजी क्रिकेटपटू विजय शंकर, मुरुगन अश्विन, अयान खान आणि के. एस. भरत यांचा समावेश आहे. ही लीग यावर्षी डिसेंबरमध्ये दुबई येथे आयोजित होण्याची शक्यता आहे. 34 वर्षीय आमिर सध्या इंग्लंडमध्ये राहतो. त्याने ब्रिटिश नागरिकत्व मिळवले आहे. आयपीएल लिलावात त्याचा समावेश होण्याची चर्चा आधीच सुरू होती, पण आता ही शक्यता वाढली आहे.
असे झाल्यास दुसऱ्या देशाचे नागरिकत्व असलेला एखादा पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्याची ही पहिली वेळ नसेल. यापूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अझर महमूद 2012 ते 2015 दरम्यान ब्रिटिश पासपोर्ट वापरून आयपीएल खेळला होता. तो किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडून खेळला. मात्र आमिरला आपल्या संघात घेण्यासाठी कोणते संघ रस दाखवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
आयपीएलच्या 20 व्या हंगामासाठी म्हणजेच आयपीएल 2027 साठीचा लिलाव पुढील महिन्यात गोव्यात होणार आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हा लिलाव 16 डिसेंबर रोजी पार पडेल. सर्व संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत आपल्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करणे बंधनकारक आहे.
Source: TV9 Marathi Sports
