मुंबई : पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी दैनंदिन जीवनातील सवयी बदलणे गरजेचे असून, पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नये, असे आवाहन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मुंबई पुस्तक महोत्सवात वरिष्ठ पत्रकार अभिषेक शर्मा यांच्याशी संवाद साधताना त्यांनी पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन, हवामान बदल, महिला सहभाग आणि युवकांच्या भविष्याबाबत आपली भूमिका मांडली.
पाणी हा जीवनाचा आधार असून, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक तापमानवाढीमुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून, त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
https://www.prahaar.in/2026/11/28/life-is-enriched-by-reading-books-minister-chandrakant-patil-assures-that-the-government-is-making-efforts-to-increase-the-reading-culture/
जलव्यवस्थापनाबाबत बोलताना त्यांनी लोकसहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. शासनाच्या योजनांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असेल, तरच त्या योजनांना यश मिळते. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्यात आली. पाणी बचत, भूजलाचे महत्त्व, ठिबक सिंचन आणि कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याच्या पद्धतींबाबत ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडूनही अनेक गोष्टी शिकायला मिळतात, असे त्यांनी सांगितले.
पर्यावरण विभागाच्या कामकाजात विज्ञानाचे ज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे सांगताना त्यांनी वनस्पतिशास्त्रासह रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांची माहिती प्रशासकीय कामकाज समजून घेण्यासाठी महत्त्वाची असल्याचे नमूद केले. यापूर्वी ग्रामविकास, जलसंधारण आणि महिला व बालविकास विभागाची जबाबदारी सांभाळताना विज्ञानाच्या अभ्यासाचा फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनातील महिलांच्या भूमिकेबाबत बोलताना महिलांमध्ये निर्णयक्षमता, प्रामाणिकपणा आणि निर्णयाप्रती कटिबद्धता हे गुण असल्याचे त्यांनी म्हटले. निसर्गाला आपण निसर्गमाता म्हणतो. आज पर्यावरणाची काळजी घेतली नाही, तर पुढील पिढ्यांच्या हक्काचा ऑक्सिजन आपण हिरावून घेत आहोत, याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
युवकांनी जागतिकीकरणाच्या काळात नव्या संधींचा स्वीकार करताना संस्कृती आणि परंपरा जपण्यावरही भर द्यावा. श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन आणि उद्योजकतेची भावना युवकांमध्ये रुजणे आवश्यक आहे. ग्रामीण युवकांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी पंकजा मुंडे यांनी मुंबई पुस्तक महोत्सवातील विविध दालनांना भेट देऊन पुस्तकांची पाहणी केली. त्यांच्यासोबत महोत्सवाचे मुख्य आयोजक आमदार अमित साटम आणि मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी उपस्थित होते.
Source: Prahaar News
