भारतीय संगीतविश्वातील स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने हजारो अजरामर गाण्यांना नवी ओळख दिली. अनेक दशकांपर्यंत त्यांनी आपल्या गायकीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
मात्र, त्यांच्या कारकिर्दीतील एका गाजलेल्या गाण्याबाबतचा रंजक किस्सा फार कमी लोकांना माहिती आहे. राज कपूर यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटातील लोकप्रिय टायटल साँग गाण्यासाठी लता मंगेशकर यांनी सुरुवातीला स्पष्ट नकार दिला होता.
एवढेच नाही तर त्या राज कपूर यांच्यावर इतक्या नाराज झाल्या होत्या की, त्यांनी रेकॉर्डिंगदरम्यान त्यांच्याशी बोलण्यासही नकार दिला होता. पण पंडित नरेंद्र शर्मा यांनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी काही अटी ठेऊन हे गाणं गायलं.
त्यानुसार लता मंगेशकर यांनी गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण केले आणि कोणाशीही संवाद न साधता त्या स्टुडिओतून निघून गेल्या. त्यानंतरही दोघांमधील रॉयल्टीवरून वाद सुरूच राहिला.
मात्र, पुढे राज कपूर यांनी लता मंगेशकर यांची समजूत काढली आणि त्यांच्यातील मतभेद दूर झाले. टीप : या बातमीतील प्रसंग राज कपूर यांच्यावरील पुस्तकातील उल्लेख आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांवर आधारित आहेत.
Source: TV9 Marathi Entertainment





