Hashtagintro

बंजारा समाजाच्या तांड्यांसाठी स्वतंत्र प्राधिकरण! 3 वर्षांत मूलभूत सुविधा, ग्रामपंचायती आणि महसुली गावांचा दर्जा देण्यावर भर

बंजारा समाजाच्या तांडा वस्त्यांच्या विकासासाठी आता स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांत तांड्यांमध्ये मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मंत्रालयात बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, तांड्यांमध्ये शाळा, अंगणवाड्या, रस्ते, पाणीपुरवठा, पाण्याच्या टाक्या आणि स्मशानभूमी यासारख्या सुविधा प्राधान्याने उभाराव्यात. सार्वजनिक विकासकामं प्राधिकरणामार्फत करावीत, तर वैयक्तिक लाभाच्या योजना संबंधित विभागांनी राबवाव्यात. यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष तयार करावं.
जनगणना पूर्ण झाल्यानंतर 700 लोकसंख्येचा निकष पूर्ण करणाऱ्या पात्र तांड्यांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करावी. पात्र तांड्यांना महसुली गावाचा दर्जा देण्याचं कामही वेगाने पूर्ण करावं, असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक तांड्याचा विकास आराखडा स्थानिक लोकांच्या सहभागातून तयार करण्यासाठी तांडास्तरीय समित्या स्थापन कराव्यात. पोहरादेवी येथील मंजूर विकासकामांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी. भाविकांसाठी पाणी, स्वच्छतागृहं आणि भक्तनिवास यासारख्या सुविधा उभाराव्यात. पोहरादेवी देवस्थानाच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कायद्याचा मसुदा मार्चपर्यंत तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
https://www.prahaar.in/2026/11/26/agristack-provides-digital-identity-to-14-4-million-farmers-maharashtra-ranks-second-in-the-country/
बंजारा समाजाची बोलीभाषा, लोककला आणि परंपरा जपण्यासाठी पोहरादेवी येथे राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करावा. गोर बंजारा साहित्य अकादमीचं काम वेगाने करून समाजाचा इतिहास आणि साहित्य मराठी आणि हिंदीत प्रकाशित करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करावी, असंही बावनकुळे म्हणाले. वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाला आवश्यक निधी आणि पूर्णवेळ अधिकारी देण्याचा प्रस्ताव सादर करावा. परदेशात आणि राज्याबाहेर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती प्रकरणांची तातडीने तपासणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह बंजारा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language