Hashtagintro

भिवंडीत खाटूश्याम मंदिरात महिला चोरट्यांचा डाव! दर्शनासाठी आलेल्या आजींचे 14 तोळे सोन्याचे दागिने लंपास

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील ठाकराचा पाडा परिसरातील प्रसिद्ध खाटूश्याम मंदिरात देवाच्या दर्शनासाठी आलेल्या एका 67 वर्षीय ज्येष्ठ महिलेला भामट्या महिला चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली. गर्दीचा फायदा घेऊन तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या दोन महिलांना कोनगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास 67 वर्षीय स्मिता रायचंद जिवानी या खाटूश्याम मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिरामध्ये असलेल्या प्रचंड गर्दीचा आणि गोंधळाचा फायदा घेत चतुर महिला चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील पर्स अलगद लांबवली. त्या पर्समध्ये सोन्याचे मौल्यवान दागिने होते. जेव्हा स्मिता यांना आपली पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणी त्यांनी तात्काळ कोनगाव पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली.

पोलिसांची धाडसी कारवाई आणि सीसीटीव्हीचा वापर
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोनगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. महिलांच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल 100 ते 105 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तासनतास तपासले. या तांत्रिक तपासाच्या आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कल्याण पश्चिमेकडील मिलिंदनगर आणि गौरीपाडा रोड परिसरातून रेशमा संतोष कसबे आणि सखु किसन कांबळे या दोन महिलांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिला गर्दीच्या धार्मिक ठिकाणी किंवा जत्रेत जाऊन ज्येष्ठ महिलांना आपले मुख्य लक्ष्य बनवत असत. गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, पर्स आणि रोख रक्कम लुटण्याची त्यांची सवय होती. पोलिसांनी या महिलांच्या ताब्यातून चोरीस गेलेले सर्वच्या सर्व 14 तोळे सोन्याचे दागिने सुरक्षितपणे हस्तगत केले आहेत. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच या प्रकरणाचा छडा लावल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language