नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर सुरू झालेल्या या प्रवासाला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’च्या 139 व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधला. हा प्रवास आणि देशातील लोकांच्या योगदानाला वंदन करणे हा माझ्यासाठी तीर्थयात्रेइतकाच पवित्र अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.
‘व्होकल फॉर लोकल’मुळे साकार होणार आत्मनिर्भर भारताचे स्वप्न
येत्या सण-उत्सवांच्या काळात कुटुंबीयांसाठी खरेदी करताना स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. तुमच्या खरेदीमुळे स्थानिक कारागिरांचा उत्साह वाढेल आणि ‘व्होकल फॉर लोकल’ अभियानाला बळ मिळेल. हे अभियान जितक्या वेगाने पुढे जाईल, तितक्याच वेगाने आत्मनिर्भर भारताचे स्वप्नही साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकशक्तीची आराधना आणि आत्मीयतेची पुंजी
“गेल्या 12 वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यातून असे अनेक सामान्य लोक समोर आले आहेत, जे राष्ट्रासाठी जगतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी देशातल्या लोकशक्तीची आराधना करतो,” असे पंतप्रधान म्हणाले. “मन की बात ऐकल्यानंतर जणू पंतप्रधान आमच्याच कुटुंबात बसून संवाद साधत आहेत, अशा आशयाचे शेकडो संदेश मला मिळाले आहेत. श्रोत्यांची ही आत्मीयता हीच माझ्यासाठी अमूल्य पुंजी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
https://www.prahaar.in/2026/10/25/union-home-minister-amit-shah-warns-drug-mafia-action-against-those-targeting-youth-in-india/
स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश
भारताची प्राचीन परंपरा असलेल्या निसर्ग आदर, परिसर स्वच्छता आणि जलस्रोतांची काळजी घेण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भर दिला. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी आणि छठ या सणांच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जात असून, आपले छोटे प्रयत्नही मोठा बदल घडवू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.
महाराष्ट्रातील ‘शबरी नेचुरल्स’च्या पॅकेजिंगला जपानचा ‘गुड डिझाइन पुरस्कार’
महाराष्ट्रातील आदिवासी समुदायाने ‘शबरी नेचुरल्स’ या उपक्रमाद्वारे मध, मोहफुले, चारोळी आणि बांबूपासून तयार केलेली उत्पादने बाजारात आणली आहेत. या उत्पादनांच्या पॅकेजिंगवर आदिवासी कलेची सुंदर छाप असून, या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाइन पुरस्कार’ मिळाला आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी कौतुकाने दिली. तसेच, कर्नाटकातील ‘बॅम्बू’ नावाचे स्टार्टअप बांबू व शेतीच्या अवशेषांपासून पॅकेजिंग साहित्य तयार करत असल्याचे सांगत त्यांनी देशातील तरुणांच्या नवनवीन प्रयोगांचे कौतुक केले.
Source: Prahaar News