Hashtagintro

मुंबईतील इमारतींच्या समूह पुनर्विकासाचे प्रस्ताव गतीने मार्गी लावा; विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांचे निर्देश

मुंबई: मुंबईतील जुन्या व जीर्ण इमारतींचा समूह पुनर्विकास करून रहिवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार निवारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी विविध भागांतील पुनर्विकास प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेतला आहे. रहिवाशांचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून हे सर्व प्रस्ताव विहित वेळेत आणि गतीने मार्गी लावावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. विधानभवन येथे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील विविध भागांतील इमारतींच्या समूह पुनर्विकासाबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत परळ-प्रभादेवी, उमरखाडी, सातरस्ता-जेकब सर्कल, धोबी घाट आणि पिंपळेश्वर परिसरातील प्रस्तावांवर सखोल चर्चा झाली.

बैठकीत प्रामुख्याने चर्चेत आलेले महत्त्वाचे प्रस्ताव:

सातरस्ता-जेकब सर्कल परिसर: विठ्ठल निवास, लक्ष्मीपती बिल्डिंग, मस्जिद चाळ, रंगवाला बिल्डिंग, झोयेब हाऊस, इस्लामिक बिल्डिंग, वसंत भवन लॉज, साई सागर, आगाखान बिल्डिंग, तयब बिल्डिंग आणि म्हाडाच्या इमारतींच्या समूह पुनर्विकासावर चर्चा करण्यात आली. हा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.

उमरखाडी परिसर: म्हाडाच्या ८१ इमारती आणि परिसरातील खासगी इमारतींच्या समूह पुनर्विकासाचा मुद्दा बैठकीत ऐरणीवर आला. यावेळी ‘उमरखाडी पुनर्वसन समिती’च्या प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध मुद्द्यांची व अडचणींची गंभीर दखल घेण्यात आली.

परळ-प्रभादेवी: जगन्नाथ भातणकर मार्गावर रस्तारुंदीमुळे बाधित झालेल्या १९ इमारतींच्या समूह पुनर्विकास योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर खल करण्यात आला.

इतर परिसर: पिंपळेश्वर, इराणी चाळ, वाणी चाळ तसेच धोबी घाट परिसरातील विविध इमारतींच्या पुनर्विकासाचा आढावाही घेण्यात आला.

https://www.prahaar.in/2026/10/21/eknath-shinde-manoj-jarange-500-crore-allegation/
रहिवाशांशी थेट संवाद आणि प्रशासकीय समन्वय
या बैठकीत संबंधित इमारतींच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व रहिवाशांनी पुनर्विकासासंदर्भातील आपल्या अपेक्षा, अडचणी आणि प्रश्न मांडले. उपसभापती सचिन अहिर यांनी रहिवाशांचे म्हणणे अत्यंत आस्थेने ऐकून घेत म्हाडा आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बाजूही जाणून घेतली. विविध भागांतील पुनर्विकासाचे प्रस्ताव मार्गी लावताना रहिवाशांचे हित, विभागांच्या भूमिका आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही यात योग्य समन्वय साधणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, एमएमआरडीए तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि समूह पुनर्विकासासाठी प्रस्तावित इमारतींचे रहिवासी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language