Hashtagintro

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत ससून गोदीतील महिला मच्छीमारांना मिळणार सुरक्षा किट

मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध ससून गोदी येथील महिला मच्छीमार भगिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’अंतर्गत ससून गोदीतील महिला मच्छीमारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात येणार आहे. या सुरक्षा किट वाटपाचा भव्य समारंभ उद्या बुधवार 28 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता, नेट मेंडिंग हॉल, राष्ट्रीय मत्स्यकी सर्वेक्षण इमारत, ससून गोदी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सुरक्षा किटमध्ये ग्लोव्हज, शूज, हेड गिअर, फिंगर कॉटन आणि मास्क यांचा समावेश आहे. मत्स्य व्यवसायातील दैनंदिन कामकाजादरम्यान महिलांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि सुरक्षित कार्यपरिसर निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मत्स्य व्यवसाय- बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी आमदार चित्रा वाघ, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे तसेच राष्ट्रीय मत्स्यकी सर्वेक्षणचे संचालक श्रीनाथ के.आर. यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

महिला मच्छीमारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मत्स्य क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मच्छीमार बांधवांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आधुनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देतानाच मच्छीमारांच्या आरोग्य व सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ससून गोदीतील महिला मच्छीमार भगिनींना सुरक्षा किटचे वाटप करण्यात येणार असून, महिला मच्छीमारांच्या कामाला सुरक्षितता, सन्मान आणि बळ देणारा हा उपक्रम ठरणार आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language