
Flipcart CEO : भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टमध्ये मोठा नेतृत्वबदल होणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कल्याण कृष्णमूर्ती यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 11 वर्षांच्या कार्यकाळानंतर ते कंपनीतून बाहेर पडणार आहेत. 25 नोव्हेंबर रोजी फ्लिपकार्टने त्यांच्या एक्झिटची अधिकृत पुष्टी केली. त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत अद्याप कंपनीने घोषणा केलेली नाही. तोपर्यंत चीफ प्रॉडक्ट अँड टेक्नॉलॉजी ऑफिसर बालाजी थियागराजन आणि कंपनीचे संचालक मंडळ मिळून कारभार पाहणार आहेत. कृष्णमूर्ती यांच्या काळात फिल्पकार्ट कंपनीने देशभरात चांगला विस्तार केला. आता त्यांनी या पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतलाय.
2017 मध्ये मिळाली होती CEO पदाची जबाबदार
कल्याण कृष्णमूर्ती 2013 मध्ये फ्लिपकार्टशी जोडले गेले होते. त्यानंतर जानेवारी 2017 साली त्यांच्याकडे CEO पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 2018 मध्ये त्यांना संपूर्ण ग्रुपचे CEO म्हणूनही नियुक्त करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रातील फ्लिपकार्टची पकड मजबूत झाली आणि कंपनीचा व्यवसाय पाच पटींपेक्षा अधिक वाढला.
फॅशनपासून फिनटेकपर्यंत विस्तार
कृष्णमूर्ती यांच्या कार्यकाळात फ्लिपकार्टने फॅशन, ट्रॅव्हल आणि फिनटेक क्षेत्रातही आपला व्यवसाय वाढवला. कंपनीचा ‘बिग बिलियन डेज’ हा सेल देशातील सर्वात मोठ्या ऑनलाइन शॉपिंग इव्हेंटपैकी एक बनला. यामुळे ग्राहकांना विविध उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स मिळू लागल्या.
IPO पूर्वी नेतृत्वबदल
फ्लिपकार्टचा लवकरच आयपीओ येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत या कंपनीच्या सर्वोच्च पदावरून कृष्णमूर्ती यांनी दूर होण्याचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे क्विक कॉमर्स क्षेत्रातही कंपनीने ‘फ्लिपकार्ट मिनिट्स’च्या माध्यमातून विस्तार सुरू केला आहे. Amazon आणि Meesho यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा सुरू आहे. एकीकडे ही स्पर्धा असताना दुसरीकडे हा नेतृत्वबदल झाला आहे. त्यामुले फ्लिपकार्ट हा बदल खूप महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे आता या कंपनीच्या सीईओपदी कोणता नवा चेहरा येणार, नव्या चेहऱ्याच्या नेतृत्त्वात कंपनीची स्थिती कशी असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Source: TV9 Marathi Business
