मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवामध्ये विसर्जित होणाऱ्या पीओपींच्या मूर्तींवर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्यावतीने मुलुंड येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. परंतु सप्टेंबर आणि त्यानंतर ऑक्टोबर महिना उलटून नोव्हेंबर उलटला तरी महापालिकेला या विसर्जित मूर्तींवर प्रक्रिया करण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. मागील वर्षीच्या सुमारे ३ हजार मेट्रीक टन पीओपीच्या विसर्जित गणेशमूर्तींचे अवशेष आणि यंदाच्या गणेशोत्सवातील सुमारे ४ हजारांहून अधिक मेट्रीक टनाहून अधिक विसर्जित गणेश मूती आणि देवीच्या विसर्जित मूर्ती आहेत. त्यामुळे या सर्व मूर्तींवर प्रक्रिया करण्यास महापालिकेला अद्यापही मुहूर्त सापडलेला नसून या भग्नावस्थेतील अवशेषांवर कुणी व्हिडीओ करून महापालिकेची प्रतिमा मलिन केल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेच्यावतीने पीओपीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन समुद्रात न करता कृत्रिम तलावांमध्ये करत आहे. त्यानुसार कृत्रिम तलाव तसेच इतर तलावांमधील विसर्जित गणेश मूर्ती संकलित करून मागील वर्षी डायघर येथे जमा केले होते. यंदा अशाप्रकारच्या विसर्जित गणेशमूर्ती मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंडवर जमा करून त्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. मागील वर्षीच्या संकलित मूर्तींचे अवशेष आणि यंदाच्या उत्सवातील पीओपीच्या गणेशमूर्ती तसेच नवरात्रोत्सवातील देवीच्या विसर्जित मूर्तीही महापालिकेने संकलित करून मुलुंड येथे जमा केल्या.
https://www.prahaar.in/2026/11/17/a-whatsapp-office-for-citizens-regarding-the-availability-of-medicines-and-medical-supplies-in-hospitals/
याठिकाणी विसर्जित पीओपीच्या गणेश मूर्ती संकलित करून त्यावर प्रक्रिया मागील २५ सप्टेंबर पर्यंत संस्थेची निवड करण्यात येणार होती. यासाठी प्रशासनानेक संस्थेकडून अभिरुची स्वारस्य अर्ज मागवले होते. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या मूर्तींवर कशाप्रकारे प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाईल याचा विचार प्रामुख्याने केला होता. परंतु, ही सर्व प्रक्रिया केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची हालचाल केली जात नाही. गणेशोत्सवाच्या काळात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी भग्नावस्थेतील संकलित मूर्ती दाखवून महापालिका कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करत नसल्याचे दाखवून दिले होते. यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली होती. विसर्जित पीओपीच्या गणेश मूर्ती संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाईल अशाप्रकारचे आश्वासन महापालिका प्रशासनाने न्यायालया दिले होते. परंतु आता नोव्हेंबर उजाडला तरी त्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. जर या मूर्तींवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे, तर त्याबाबत प्रशासन तातडीने कार्यवाही का करत नाही असा सवाल उपस्थित करत आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यासाठी दोन संस्थांनी स्वासस्य दाखवले असून त्यातील अंतिम एका संस्थेची निवड करण्यासाठी प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे, त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल असे सांगण्यात येत आहे.
Source: Prahaar News
