Hashtagintro

वैभव सूर्यवंशीला टीम इंडियातून घरी पाठवा! आकाश चोप्राचा संताप; रणजी क्रिकेट खेळण्याचा दिला सल्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या खेळण्याच्या संधीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यातून वैभवला वगळण्यात आल्यानंतर माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्रा यांनी संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वैभवला केवळ एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यावरच संधी मिळणार असेल, तर त्याला भारतीय संघातून घरी पाठवून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी द्यावी, असे परखड मत चोप्रा यांनी व्यक्त केले.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या 2 सामन्यांमध्ये वैभवने अनुक्रमे 4 आणि 45 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात त्याचे अर्धशतक अवघ्या 5 धावांनी हुकले होते. मात्र, इशान किशन दुखापतीतून सावरल्यानंतर चौथ्या टी-20 सामन्यात वैभवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागले.
याच निर्णयावर आकाश चोप्रा यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना ते म्हणाले की, मागील सामन्यात अभिषेक शर्माने शतक झळकावले, तर वैभवचे अर्धशतक थोडक्यात हुकले. अशा परिस्थितीत इशान किशन तंदुरुस्त झाल्यानंतर कोणाला संघाबाहेर ठेवायचे, हा प्रश्न निर्माण झाला. मात्र, वैभवला केवळ दुखापतग्रस्त खेळाडूचा पर्याय म्हणूनच पाहिले जात असेल, तर हा त्याच्यावर अन्याय ठरेल.
https://www.prahaar.in/2026/10/31/west-indies-defeat-bangladesh-by-8-wickets-team-india-benefits-directly-in-wtc-2027/
चोप्रा पुढे म्हणाले, वैभवला सातत्याने खेळण्याची संधी मिळणार नसेल, तर त्याला घरी पाठवून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळू द्यावे. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये राहून त्याला अनुभव मिळू शकतो; मात्र प्रत्यक्ष मैदानावर फलंदाजी करण्याची संधी मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. दीर्घकाळ बाकावर बसण्यापेक्षा त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर वेळ फलंदाजी करावी.
दरम्यान, वैभवच्या भविष्यातील भूमिकेबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही चोप्रा यांनी केली. संघाकडे वैभवसाठी नेमका कोणता दीर्घकालीन आराखडा आहे, हे चाहत्यांना आणि क्रिकेटप्रेमींना समजले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, चौथ्या टी-20 सामन्यात पुनरागमन करणाऱ्या इशान किशनला मोठी खेळी करता आली नाही. 260 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तो शून्यावर बाद झाला. त्यामुळे वैभवला संघातून वगळण्याच्या निर्णयावर क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language