पुण्याच्या नीरा देवघर धरणातून 750 क्युसेकने नीरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पावसानं दडी दिल्यामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पुण्यातील भोर तालुक्यात पाऊस नसल्याने ओढे आणि नदीनाले कोरडे पडले होते. त्यामुळे पाण्याअभावी शेती सुकून चालली होती आणि पिके करपू लागली होती. या नीरा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांकडून धरणातून पाणी सोडण्याची सातत्याने मागणी केली जात होती.
शेतकऱ्यांच्या या मागणीनंतर प्रशासनाने नीरा देवघर धरणातून 750 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे आवर्तन सोडल्यामुळे आता शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे. या पाण्यामुळे पिकांचे जतन होईलच, शिवाय पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याचीही सोय होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे.
Source: TV9 Marathi National
