मुंबई : राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्य शासनाच्या हमीवर सहकारी साखर कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या अटी व शर्ती राज्य सरकारने अधिक कठोर केल्या आहेत. सुधारित निकषांनुसार कारखान्यांना १०० कोटी रुपये किंवा एफएसीआरनुसार ठरणारी कर्जपात्र रक्कम, यापैकी कमी रकमेचेच कर्ज मिळणार आहे. कर्जवसुलीसाठी साखर आणि इथेनॉल विक्रीतून कपात, संयुक्त बँक खाते आणि अध्यक्षांसह सर्व संचालकांची वैयक्तिक हमी बंधनकारक करण्यात आली आहे. अटींचे उल्लंघन झाल्यास कर्जमंजुरी रद्द करून संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करण्याचा अधिकार सरकार आणि एनसीडीसीला असेल.
सहकार विभागाने शुक्रवारी यासंदर्भात शुद्धीपत्रक जारी केले. एनसीडीसीच्या या योजनेअंतर्गत राज्यातील ३६ सहकारी साखर कारखान्यांच्या ४१ कर्जप्रकरणांत आतापर्यंत ५ हजार ४८८.८४ कोटी रुपयांचे अर्थसाह्य मंजूर करून वितरित करण्यात आले आहे. मात्र, वितरित कर्जाच्या मुद्दल आणि व्याजाची वसुली असमाधानकारक असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. कर्जफेडीची पुरेशी क्षमता नसतानाही मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याने आणि परतफेड वेळेत न झाल्यास शासनाचा निधी अडकून अतिरिक्त वित्तीय भार निर्माण होण्याची शक्यता असल्याने साखर आयुक्तांच्या प्रस्तावानुसार धोरणातील अटी सुधारण्यात आल्या आहेत. जुन्या धोरणातील काही अटींमध्ये बदल करण्याबरोबरच सहा नवीन अटींचा समावेश करण्यात आला आहे.
सुधारित निकषांनुसार कर्ज मागणीच्या प्रस्तावात कारखान्याला अर्थसाह्याची आवश्यकता का आहे, याबाबत अचूक आकडेवारी सादर करावी लागणार आहे. कर्जपात्रतेसाठी स्थिर मालमत्ता कव्हरेज रेशो (एफएसीआर) किमान १:१.५ असणे आवश्यक आहे. या गणनेत स्थावर मालमत्तेच्या संभाव्य वाढीचा विचार करता येणार नाही. तसेच सनदी लेखापालांनी प्रमाणित केलेला सरासरी कर्ज परतफेड क्षमता निर्देशांक (डीएससीआर) किमान १.३३ पट असणे बंधनकारक आहे. भविष्यातील अंदाजित डीएससीआर हा कारखान्याच्या मागील तीन आर्थिक वर्षांच्या प्रत्यक्ष आर्थिक आकडेवारीशी सुसंगत असावा आणि त्यात अवाजवी तफावत नसावी, अशी अट घालण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/27/devendra-fadnavis-then-add-my-name-to-the-list-of-those-who-put-up-illegal-hoardings/
कर्ज मागणाऱ्या कारखान्याचा मागील आणि चालू आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण अहवालानुसार संचित तोटा ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक नसावा. या तपासणीसाठी कारखान्यांच्या लेखापरीक्षित आर्थिक पत्रकांवरच अवलंबून न राहता साखर आयुक्तालयाकडून शासकीय लेखापरीक्षकांमार्फत स्वतंत्र तपासणी आणि छाननी केली जाणार आहे. मालमत्तेच्या पुनर्मूल्यांकनाबाबतही अट घालण्यात आली आहे. अर्थसाह्याचा प्रस्ताव सादर करण्यापूर्वीच्या दोन वर्षांतील लेखापरीक्षित ताळेबंदात मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन नमूद असणे आवश्यक राहील. हे मूल्यांकन संबंधित परिसराच्या दरसूचीनुसार आणि मुद्रांक विभागाच्या वार्षिक बाजारमूल्य दरतक्त्यानुसार करावे लागेल. वर्ग-२ जमिनींचे मूल्यांकन ५० टक्के ग्राह्य धरले जाणार आहे.
कर्जवसुलीची खात्री करण्यासाठी साखर आणि इथेनॉल विक्रीवर टॅगिंगद्वारे किमान २५० रुपये प्रति क्विंटल किंवा प्रति लिटर कपात करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासकीय येणेबाकीच्या परतफेडीसाठी लागू असलेल्या तरतुदीनुसार प्रति क्विंटल किंवा प्रति लिटर २५ अथवा ५० रुपये टॅगिंगद्वारे जमा करावे लागतील. साखर मालतारण कर्ज देणाऱ्या किंवा मॉनिटरिंग बँकेवरही कर्जवसुलीची जबाबदारी निश्चित केली जाणार असून, त्रिपक्षीय करारात त्याचा समावेश करावा लागेल.
साखर, इथेनॉल तसेच प्राथमिक आणि दुय्यम उपपदार्थांच्या विक्रीतून होणाऱ्या कपातीची रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यासाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत संयुक्त बचत खाते उघडावे लागेल. टॅगिंगची रक्कम या खात्यात जमा झाल्याचे संबंधित प्रादेशिक सहसंचालक किंवा विशेष लेखापरीक्षकांनी प्रमाणित केल्यानंतरच साखर अथवा इथेनॉल कारखान्याबाहेर नेण्यासाठी गेटपास दिला जाईल. सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्यात होणाऱ्या विजेच्या रकमेतून कपात करायची असल्यास वीज निर्मिती व वितरण कंपनीकडून मिळणारी रक्कम याच संयुक्त खात्यात जमा करावी लागणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/27/amrit-drone-mission-opportunity-for-tribal-youth-to-undergo-drone-pilot-training-call-to-participate-in-the-amrut-drone-mission/
नियम झाले कठोर
– यापूर्वी या योजनेतून कर्ज घेतलेल्या कारखान्यांना नव्याने कर्जाचा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी मागील कर्जाची संपूर्ण देय रक्कम भरावी लागेल. तसेच कर्ज परतफेडीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक वैधानिक कागदपत्रे सादर केल्यानंतरच नवीन कर्जासाठी पात्रता मिळेल. अर्थसाह्य मिळाल्यानंतर राज्य सरकारची पूर्वपरवानगी आणि एनसीडीसीची शिफारस घेतल्याशिवाय नवीन प्रकल्प उभारता येणार नाही किंवा स्थिर मालमत्तेत गुंतवणूक करता येणार नाही. कारखान्याच्या व्यवस्थापनात बदल झाल्यास त्याची माहिती राज्य सरकार आणि एनसीडीसीला तातडीने देणेही बंधनकारक असेल.
– कर्जाची संपूर्ण परतफेड होईपर्यंत केंद्र किंवा राज्य सरकारकडून कारखान्याला मिळणारे कोणतेही अनुदान कर्ज आणि व्याजाच्या परतफेडीसाठी कर्ज खात्यात जमा करावे लागेल. या अटीचे पालन न केल्यास ती आर्थिक अनियमितता मानली जाणार आहे. कर्जाच्या अटींचे उल्लंघन झाल्यास कर्ज मंजुरी रद्द करणे आणि संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करण्याचे अधिकार राज्य सरकार व एनसीडीसीला देण्यात आले आहेत.
– कर्जाची परतफेड सुरू असेपर्यंत अंदाजित रोख निधी उपलब्धतेच्या आधारे डीएससीआर किमान १.०० पट राखणेही आवश्यक राहील. हे प्रमाण त्यापेक्षा कमी झाल्यास अतिरिक्त सुरक्षा तारण द्यावे लागेल. त्यामध्ये कारखान्याचे अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ सदस्यांची वैयक्तिक हमी, शासनाच्या नावे संपूर्ण मालमत्ता तारण ठेवणे, विक्री उत्पन्नाचे टॅगिंग किंवा एस्क्रो खात्याद्वारे वसुली आणि शासनाच्या नावे पुढील तारखेचे धनादेश (पीडीसी) देणे यांचा समावेश आहे.
– कर्ज घेतलेल्या प्रत्येक कारखान्याच्या कर्ज विनियोगाची, मुद्दल व व्याजाच्या परतफेडीची, थकबाकीची आणि तारण मालमत्तेची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ८४(४) नुसार विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ (साखर) यांची नियुक्ती केली जाणार आहे. कर्जाची संपूर्ण परतफेड होईपर्यंत हे लेखापरीक्षक आवश्यकतेनुसार तपासणी करून साखर आयुक्तालयाला अहवाल सादर करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Source: Prahaar News
